पिग्मी कमिशनमधील कपातीमुळे पिग्मी एजंट्स अडचणीत…

कमिशन वाढवून मिळावे ; मालवणातील पिग्मी एजंट्सची मागणी..

⚡मालवण ता.०६-:
शासनाने पिग्मी एजंटांच्या कमिशन संदर्भात ३ टक्के वरून २.५० टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय सर्व पिग्मी एजंटांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरणारा आहे. २. ५० टक्के पर्यंत कमिशन कमी केल्याने पिग्मी एजंटच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होणार आहेत, त्यामुळे कमिशन वाढवून मिळावे, अशी मागणी मालवण तालुक्यातील पिग्मी एजंट्सनी मालवण येथील सहाय्यक निबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मालवण मेढा राजकोट येथील सहकारी संस्था सहाय्यक निबंधक कार्यालयात सहायला निबंधक श्री. अजय हिर्लेकर यांची भेट घेऊन मालवण मधील विविध सहकारी पतसंस्थेच्या पिग्मी एजंटनी कमी झालेल्या कमिशन टक्केवारी बाबत चर्चा करत निवेदन सादर केले. यावेळी गौरव बिलये, आप्पा मालंडकर, चेतन हडकर, उदय घाडी, जितेंद्र राणे, प्रशांत पांगे, शैलेश मुणगेकर, नरेंद्र कोदे, गोविंद शेटये, विनोद बिलये, संतोष गोवेकर, सुनील मालवणकर, संतोष वायंगणकर, प्रथमेश लुडबे, मनस्वी कदम, कविता मयेकर, सारिका मोरजे, मोक्षदा धुरी, प्राची तारी, रुचिता मुणगेकर, प्रेमानंद मलये, श्वेता हळदणकर, विल्सन गिरकर, फुलेतेना नरोना, शुभदा साटम, श्रेया गवंडी आदी व इतर पिग्मी एजंट उपस्थित होते.

मागील ३० वर्षांपासून आम्ही ३% कमिशनवर काम करत आलो आहोत. कोरोना सारखे संकट असो किंवा सतत वाढणारी महागाई असो, पिग्मी एजंट हा घटक कायम उपेक्षित राहिलेला आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या परिस्थितीत ३% कमिशनवर काम करणेच अत्यंत कठीण झाले आहे, कारण हे कमिशन महागाईच्या तुलनेत अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत २.५०% कमिशनवर काम करणे आम्हाला अधिकच कठीण होणार आहे. पतसंस्थांची आर्थिक घडी सुरळीत ठेवण्यासाठी पिग्मी एजंट हा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. आम्ही पिग्मी संकलन, कर्ज हप्ते गोळा करणे यांसारख्या विविध जबाबदाऱ्या उन्हात-पावसात फिरून प्रामाणिकपणे पार पाडत असतो. तरी देखील आजपर्यंत पिग्मी एजंटांसाठी कोणत्याही प्रकारच्या योजना उपलब्ध नाहीत. तसेच विमा, बोनस, ग्रॅज्युइटी, पेन्शन, मेडिकल अशा कोणत्याही सुविधा आम्हाला किंवा आमच्या कुटुंबियांना मिळत नाहीत, असे पिग्मी एजंट्सनी निवेदनात म्हटले आहे.

अशा परिस्थितीत कमिशन २.५०% पर्यंत कमी करणे हे आमच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम करणारे असून, आमचे दैनंदिन जीवन अधिक कठीण बनवणारे आहे. आजपर्यंत पिग्मी एजंट हा घटक उपेक्षित राहिलेला आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला हा निर्णय पुनर्विचार करून पिग्मी एजंटांचे कमिशन सध्याच्या महागाईच्या दृष्टीने वाढवून द्यावे, अशी मागणी पिग्मी एजंट्सनी शासनाकडे केली आहे.

यावेळी सहायक निबंधक अजय हिर्लेकर यांनी सदर कमिशन कपातीचा निर्णय राज्यशासनाने घेतला असून पिग्मी एजंटची मागणी आपण वरिष्ठ पातळीपर्यंत पोहचवू असे सांगितले. याबाबत वरिष्ठ पातळीवरही शासनाचे आम्ही लक्ष वेधणार असल्याचे पिग्मी एजंट्सनी सांगितले.

You cannot copy content of this page