वाफोलीत सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांचा सत्कार…

⚡बांदा ता.०४-: श्री देवी माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाफोली गावात पिंपळेश्वर युवक मंडळ (मधलीवाडी) व ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तसेच बांदा–वाफोली ग्रामीण मार्ग क्रमांक ९३ च्या काँक्रीटीकरण व काम मार्गी लावण्यात दिलेल्या योगदानाबद्दल वाफोली आईरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांचा सत्कार करण्यात आला.
पिंपळेश्वर युवक मंडळाने आयोजित केलेल्या ‘बाळू मामा’ या नाट्यप्रयोगाच्या मंचावर संजय आईर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले.
सत्कारास उत्तर देताना संजय आईर म्हणाले की, “वाफोली गावात झालेला हा सत्कार माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय आहे. इतर सर्व सत्कारांपेक्षा हा क्षण अधिक प्रेरणादायी असून मला पुढील कार्यासाठी नवे बळ देणारा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “बांदा–वाफोली ग्रामीण मार्गाच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामात गावकऱ्यांनी दिलेले सहकार्य मोलाचे आहे. या कार्यात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला असून हा सत्कार मी सर्व ग्रामस्थांना अर्पण करीत आहे.”
यावेळी त्यांनी पिंपळेश्वर युवक मंडळ (मधलीवाडी) व वाफोली ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास गावातील मान्यवर, युवक मंडळाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो:-
वाफोली येथे संजय आईर यांचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page