⚡कणकवली ता.०४-:
दिवाणी न्यायालय कणकवली येथे “राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण वीर परिवार सहायता योजना २०२५” अंतर्गत संरक्षण कर्मचारी, माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष कायदे विषयक शिबिर उत्साहात पार पडले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार आयोजित या शिबिराचे अध्यक्षस्थान दिवाणी न्यायाधीश शुभम लटूरिया यांनी भूषविले.
देशसेवेत आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या माजी सैनिकांच्या कायदेशीर हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना मोफत व सुलभ न्यायसहाय्य उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरात ज्येष्ठ वकील मिलिंद सावंत तसेच वकील श्रीमती दीपिका राठोड यांनी माजी सैनिकांना विविध कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. पेन्शन विषयक प्रश्न, कौटुंबिक व मालमत्ता विषयक वाद, तसेच मोफत विधी सहाय्य कसे मिळवावे, याबाबत त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. कणकवली व वैभववाडी तालुक्यातील एकूण १७ माजी सैनिकांनी या शिबिराला उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.
कार्यक्रमास न्यायालयाच्या अधीक्षक सौ. परब, वरिष्ठ लिपिक सौ. आचार्य यांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील भूषण बी. बिसुरे यांनी प्रभावीपणे केले. सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघाचे सचिव संतोष मुसळे व दत्तगुरु गावकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करून सर्व आयोजकांचे आभार मानले. दिवाणी न्यायालय कणकवली येथे आयोजित हा उपक्रम केवळ एक कायदेविषयक शिबिर न राहता, समाजाच्या ऋणी असलेल्या वीर जवानांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती न्यायव्यवस्थेच्या बांधिलकीचा जिवंत संदेश देणारा ठरला. न्यायाधीश शुभम लटूरिया यांच्या नेतृत्वाखालील हा उपक्रम उपस्थितांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करणारा आणि प्रेरणादायी ठरला.
