नेहा करंदीकर:वराडकर हायस्कूल कट्टा येथे करिअर समुपदेशन संपन्न..
⚡मालवण ता.२८-:
दहावी नंतर केवळ पारंपारिक वाटा न निवडता विद्यार्थ्यांनी स्वतःची आवड आणि कौशल्ये ओळखून करिअरची निवड करावी, असे प्रतिपादन करियर मार्गदर्शक नेहा करंदीकर – हुनारी यांनी कट्टा येथील वराडकर हायस्कुल मध्ये बोलताना केले.
बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण आणि वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दहावी नंतर काय?’ या विषयावर विशेष करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा चे कार्यवाह दीपक भोगटे यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. या प्रसंगी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, वराडकर हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे, सेवांगण कट्टाचे कार्यवाह दीपक भोगटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षक श्री. वाजंत्री यांनी प्रशालेमार्फत १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना दिली. या कार्यक्रमात तज्ज्ञ करियर मार्गदर्शक नेहा करंदीकर – हुनारी यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. १० वी नंतर उपलब्ध असणारे विविध कोर्सेस, स्पर्धा परीक्षा आणि तांत्रिक क्षेत्रातील संधींची सविस्तर माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी करिअरची निवड करताना विद्यार्थी आणि पालकांमध्ये मैत्रीपूर्ण आंतरक्रिया असणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी मुलांवर आपली मते न लादता त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या पाहिजेत, असे सांगितले. तर मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी केवळ मित्र-मैत्रिणी एखादा विशिष्ट अभ्यासक्रम निवडतात म्हणून आपणही तोच निवडणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा कल ओळखून अभ्यासक्रमाची निवड करावी, असे सांगितले. दीपक भोगटे यांनी आपल्या जीवनातील स्वानुभव सांगत विद्यार्थ्यांना जिद्द आणि चिकाटीने यश कसे मिळवावे, याचे मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. गावडे यांनी एसएससी (SSC) बोर्डाच्या परिपत्रक व नियमानबद्दल सौ. गावडे यांनी सविस्तर माहिती पालकांना करून दिली. याप्रसंगी शिक्षण मंडळाच्या कॉपीमुक्त परीक्षा या उपक्रमाबद्दल माहिती देऊन पालक विद्यार्थी शिक्षक यांना कॉपीमुक्त परीक्षा अभियानातील शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. वीणा शिरोडकर यांनी केले. या कार्यक्रमाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
