आजगाव विद्या विहार च्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम…

विद्या विहार च्या एस.एस.सी.बॅच १९८९ कडून शाळेच्या कंपाउंडची रंगरंगोटी व नामफलकाची भेट..

⚡सावंतवाडी ता.२८-: आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल, येथील एस.एस.सी. बॅच १९८९ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक प्रेरणादायी असा स्तुत्य उपक्रम राबविला. प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने शाळेच्या संपूर्ण कंपाउंडची रंगरंगोटी करून दिली तसेच शाळेच्या नावाचा आकर्षक व सुस्पष्ट असा नवीन नाम फलक बसवून देत शाळेचं रंगरूपच बदललं.
या उपक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांनी कोणतीही बाह्य मदत न घेता स्वतः आर्थिक सहकार्य केले तसेच प्रत्यक्ष श्रमदानही केले. अनेक वर्षांनंतरही आपल्या शाळेबद्दल असलेली जिव्हाळ्याची भावना आणि कृतज्ञता या उपक्रमातून दिसून आली. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न झाल्याने शाळेच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे.
या कामात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत रंगकामासाठी मोलाची मदत केली. वरिष्ठ माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी श्रमदान करत सामाजिक जाणीव व शाळेबद्दलची आपुलकी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिली.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल लोक कल्याण शिक्षण संस्था व विद्या विहार इंग्लिश स्कूल यांच्या वतीने एस.एस.सी. बॅच १९८९ चे माजी विद्यार्थी तसेच सहकार्य करणाऱ्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे माजी विद्यार्थी आणि शाळा यांचे नाते अधिक दृढ होत असून सध्याच्या विद्यार्थ्यांनाही समाजोपयोगी कार्याची प्रेरणा मिळत असल्याचे मत प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी व्यक्त केले.

You cannot copy content of this page