⚡मालवण ता.२७-:
मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागासाठी होणाऱ्या निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १४ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून एका ठिकाणी तिरंगी तर इतर ठिकाणी दुरंगी लढत होत आहे. तर मालवण पंचायत समितीमधील १२ जागांसाठी तब्बल २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये आडवली मालडी पंचायत समिती जागा बिनविरोध झाल्याने आता ११ जागांसाठी २८ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
दरम्यान, आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघातून ठाकरे शिवसेनेच्या उमेदवार सौ. रोहिणी अरुण राऊत यांनी आज अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या उमेदवार सौ. सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध निवडून आल्याने सौ. परुळेकर यांच्या रूपाने भाजपने मालवण पंचायत समिती मध्ये खाते खोलले आहे.
मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद मतदार संघांसाठी २८ आणि बारा पंचायत समिती जागांसाठी ५३ असे ८१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी पंचायत समितीचा १ अपक्ष उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने ८० जण निवडणूक रिंगणात होते. त्यानंतर शनिवारी जिल्हा परिषदेचे दोन आणि पंचायत समितीचे तीन अशा ५ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलल्याने ७५ उमेदवार राहिले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीसाठी २८ उमेदवार तर जिल्हा परिषदेसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आडवली मालडी जिल्हा परिषद गटात सोनाली घाडीगांवकर (शिंदे शिवसेना), माधुरी सावंत (ठाकरे शिवसेना), आचरा गटात संजना रेडकर (ठाकरे शिवसेना), वर्षा सांबारी (शिंदे शिवसेना), मसुरे गटात क्षमा हडकर (भाजप), आनंदी परब (ठाकरे शिवसेना), सुकळवाड गटात गौतमी तळगावकर (वंचित बहुजन आघाडी), पूजा चव्हाण (ठाकरे शिवसेना), सुमेधा पाताडे (शिंदे शिवसेना), पेंडुर गटात संतोष साटविलकर (शिंदे शिवसेना), घनःश्याम राणे (ठाकरे शिवसेना), वायरी भूतनाथ गट साक्षी लुडबे (ठाकरे शिवसेना), अक्षता गावडे (शिंदे शिवसेना पुरस्कृत अपक्ष) यांचे अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हा परिषदेसाठी सहा मतदार संघात १३ उमेदवारांमध्ये लढत होत आहे.
पंचायत समितीच्या अकरा जागांसाठी २८ उमेदवारांमध्ये लढत होत आहेत त्यात आडवली मालडी पंचायत समिती गण- सीमा परुळेकर (भाजप – बिनविरोध), शिरवंडे गण- युवराज मेस्त्री (ठाकरे शिवसेना), दीपक चव्हाण (शिंदे शिवसेना), चिंदर गण – दीपक सुर्वे (भाजप), समीर लब्दे (ठाकरे शिवसेना), महेंद्र मांजरेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), आचरा गण – लवू मालंडकर (ठाकरे शिवसेना), प्रवीण आचरेकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), गणेश तोंडवळकर (शिंदे शिवसेना), जुबेर काझी (अपक्ष), कोळंब गण – योजना कांबळी (भाजप), पूजा गवंडी (ठाकरे शिवसेना), मसुरे मर्डे गण – वैभव चव्हाण (ठाकरे शिवसेना), संजय ठाकूर (शिंदे शिवसेना), पोईप गण- प्रज्ञा चव्हाण (शिंदे शिवसेना), शुभ्रा मांजरेकर (अपक्ष), प्राजक्ता परब (ठाकरे शिवसेना), सुकळवाड गण- प्रसाद मोरजकर (अपक्ष), प्रणय मयेकर (ठाकरे शिवसेना), संतोष गावडे (भाजप), वराड गण- माधुरी मसुरकर (भाजप), दीक्षा रेवडेकर (ठाकरे शिवसेना), पेंडुर गण- सप्तशीला धामापूरकर (ठाकरे शिवसेना), रिया बावकर (शिंदे शिवसेना), कुंभारमाठ गण- प्रणिता लंगोटे (ठाकरे शिवसेना), मानसी भोगावकर (शिंदे शिवसेना), वायरी भूतनाथ गण- पास्कोल रॉड्रीग्ज (ठाकरे शिवसेना), देवानंद लुडबे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), घनःश्याम झाड (भाजप) यांचे अर्ज कायम राहिले आहेत.
आडवली मालडी पंचायत समिती मतदार संघात ठाकरे शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढविणाऱ्या रोहिणी राऊत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे मालवणच्या माजी सभापती आणि भाजपच्या उमेदवार सीमा सतीश परुळेकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. सौ. रोहिणी राऊत या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तहसील कार्यालयात आल्या असता ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांना थांबवून चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भाजप पदाधिकारीही त्यांच्या सोबत असल्याने काही काळ वातावरण तंग बनले होते. अशाही परिस्थितीत सौ. राऊत यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला अर्ज मागे घेत असल्याचे पत्र दिले. हे पत्र देताना आपण स्वखुशीने उमेदवारी मागे घेत असल्याचे स्पष्ट केले
राधिका परब आणि संजीवनी लुडबे यांनी घेतले उमेदवारी अर्ज मागे
मसुरे जिल्हा परिषद मतदार संघात शिंदे शिवसेनेने पक्षाचा एबी फॉर्म दिलेल्या सौ. राधिका श्रीकृष्ण परब यांनी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार म्हणून तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र शिंदे शिवसेनेच्या पक्ष श्रेष्ठी कडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश आल्याने या आदेशाचे पालन करीत सौ. राधिका श्रीकृष्ण परब यांनी आपले दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले. खासदार नारायण राणे यांचे समर्थक असणारे डॉ. श्रीकृष्ण परब यांच्या सौ. राधिका परब या पत्नी आहेत. तर वायरी भूतनाथ जिल्हा परिषद मतदार संघातून शिंदे शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. संजिवनी संजय लुडबे यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला गेल्याने शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावडे हे काहीसे नाराज होते. त्यांची नाराजी घालविण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी सौ. संजीवनी लुडबे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे या सूचनांचा आदर राखीत संजीवनी लुडबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजा गावडे यांच्या पत्नी सौ. अक्षता राजन गावडे यांना थेट पाठिंबा दिला.
