ज्ञानदीप वाचनालय गुळदुवे येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा…

विविध मान्यवरांचा सत्कार व यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला सन्मान..

⚡सावंतवाडी ता.२७-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ज्ञानदीप वाचनालय गुळदुवे येथे दिनांक २६ जानेवारी रोजी मुलांची निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत एकूण २० स्पर्धकांनी भाग घेतला.यावेळी पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष फटू नारायण धर्णे हे होते.व्यासपीठावर उपसरपंच अशोक धर्णे, प्रमुख पाहुणे डोंगरपाल हायस्कूलचे निवृत्त शिक्षक बाळकृष्ण राणे, कार्यवाह अरूण धर्णे, खजिनदार श्रीमती ज्योती पेंडसे,अनंत धर्णे,सोनू धर्णे, गीता धर्णे होत्या.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले.
यापूर्वी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेची बक्षिसे यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.मार्च २०२५च्या माध्यमिक शालांत परीक्षेत गुळदुवे गावातून उत्तीर्ण मुलांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
वाचनालयाचे वयोवृद्ध रोजवाचक अनंत नीळकंठ धर्णे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष फटू नारायण धर्णे यांच्या हस्ते करण्यात आला.दुसरे वयोवृद्ध रोजवाचक सोनू राजाराम धर्णे यांचा सत्कार प्रमुख पाहुणे बाळकृष्ण राणे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना अनंत धर्णे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या आणि मुलांना गावातील वाचनालयाचा लाभ घेऊन आपले ज्ञान अद्ययावत करा असा संदेश दिला.
बाळकृष्ण राणे यांनी मुलांना संस्कारक्षम कथा सांगितल्या. वाचनाचा छंद बालपणापासून कसा जोपासला ते सांगितले.कमी बोला ,जास्त निरीक्षण करा,माणसे ओळखायला शिका असेही त्यांनी सांगितले.
अशोक धर्णे यांनी स्पर्धांत भाग घेऊन विद्यार्थ्यांनी आपला व्यक्तिमत्त्व विकास साधला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाला रमाकांत शेटकर, भार्गव धर्णे,संदीप आडारकर, वर्षा मामलेकर, सिद्धी कारेकर, रूपेश धर्णे ,ग्रंथपाल नंदकिशोर धर्णे, कर्मचारी अनिल जोशी ,विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कार्यवाह अरूण धर्णे यांनी केले.यावेळी उपस्थित मुलांना खाऊ वाटून व तिळगूळ समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

You cannot copy content of this page