पत्रकार परिषदेत उबाठा पदाधिकाऱ्यांची माहिती:गेल्या अकरा वर्षात महामार्गाची दुरवस्था..
कुडाळ : सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी गेल्या गणेश चतुर्थीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असे सांगितले होते. पण रस्ता पूर्ण होणे सोडाच अस्तित्वात असलेल्या मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अकरा वर्षातच रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने येत्या १३ ऑगस्टला हुमरमळा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रमुख संदेश पारकर, बाबुराव धुरी, माजी आमदार परशुराम उपरकर, सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होईल. त्यात सिंधुदुर्गातील सर्व जनतेने सहभागी व्हावं असं आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कुडाळ एमआयडीसी येथे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आ.वैभव नाईक बोलत होते. यावेळी माजी आ. परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर,शिवसेना नेते सतीश सावंत, युवक जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट , कृष्णा धुरी,गंगाराम सडवेलकर,बबन बोभाटे, बाबल गावडे,दीपक गावडे आदी उपस्थित होते.
माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, संपूर्ण देशामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक रस्ते केले परंतु मुंबई गोवा महामार्गाचा रस्ता होऊ शकलेला नाही.याला नितीन गडकरी सुद्धा जबाबदार आहेत.कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेले आहेत,अनेक ठिकाणी रस्त्याचे काम निकृष्ट केल्यामुळे बहुतांश ठिकाणी रस्त्याची पडझड होत आहे. मुंबईतील चाकरमानी दरवर्षी गणेशोत्सवला येतात, यावर्षी सुद्धा चाकरमानी मोठ्या प्रमाणात येतील,त्यांना त्रास होऊ नये तसेच सरकारला जाग आणण्यासाठी बुधवार दि.१३ आगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ तालुक्यात मुंबई गोवा हायवेवरील हुमरमळा येथे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. खरंतर हा महामार्ग अकरा वर्षांपूर्वी सुरू झाला मात्र सद्यस्थितीत या महामार्गाला जीवघेणे खड्डे पडले आहेत, अनेक ठिकाणी अपघात होत आहेत,ज्या उद्देशाने हा चौपदरीकरण महामार्ग बनवण्यात आला, तो अजूनही पूर्ण झालेला नाही,तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदर महामार्ग मागील गणेशोत्सवात पूर्ण होईल असे सांगितले होते मात्र आता दुसऱा गणेशोत्सव आला तरी महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही.अजूनही सदर महामार्ग पुढील एक वर्ष पूर्ण होणार नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संदेश पारकर,माजी आमदार परशुराम उपरकर, सतीश सावंत,शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,युवा सेना व महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली दि.१३ जुलैला चक्का जाम आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे श्री.नाईक यांनी सांगितले.
यावेळी माजी आ. परशुराम उपरकर म्हणाले की, गेल्या अनेकवर्षापासून राज्य बदलली,मंत्री बदलले,तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याच महामार्गावरून फेरफटका मारला आणि खड्डे बुजवले जाणार असे सांगितले, त्यानंतर रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री झाले; पण या दोन्ही मंत्र्यांच्या कालावधीत महामार्गाचे काहीच काम झालं नाही, आता पण पालकमंत्री तसंच सांगत आहेत, की खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे . खड्डे बुजवीत आहेत ते कशाने बुजवित आहेत? ठेकेदाराला प्रत्येक वर्षी दहा टक्क्याने पैसे दिले जात आहेत. परिणामी येथील जनतेवर ठेकेदार किंवा पालकमंत्री उपकार करत नाही.जनतेच्या पैशातील ते पैसे ठेकेदाराला मिळत आहेत. त्या पैशातून सुद्धा ठेकेदार रस्त्यांचे खड्डे चांगल्या पद्धतीने भरत नाहीत ही शोकांतिका आहे.त्या विरोधात सुद्धा हे आमचे आंदोलन असल्याचे श्री उपरकर यांनी सांगितले.
यावेळी संदेश पारकर म्हणाले की, सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाची पूर्णतः दुरावस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी या मार्गावर अपघात होत आहेत. गेली अनेक वर्षे अनेक नेते हा महामार्ग पूर्ण होणार अशी आश्वासने देत आहेत. जिल्हा वासिम व ठाकरे शिवसेनेच्या वतीने फार मोठे आंदोलन ओसरगांव येथे टोलच्या संदर्भात तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली केलेलं होतं. त्यावेळी टोल वसुली सुरुवात करणार होते, अशावेळी जिल्ह्यातील जनता,व्यापारी, शिवसैनिक एकत्र आले, त्यामुळे टोल थांबला.एकूणच वर्षाला २४ ते २५ कोटी रुपये म्हणजेच गेल्या तीन वर्षात ७० ते ७५ कोटी रुपये आपल्या जनतेचे वाचले गेले. आजही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. यावर आवाज उठवण्यासाठी सिंधुदुर्ग शिवसेनेच्या वतीने चक्का जाम आंदोलन हुमरमळा येथे घेत आहोत, या आंदोलनात जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री.पारकर यांनी केले आहे.
यावेळी सतिश सावंत म्हणाले की, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाची पायाभरणी केली,त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, शंभर वर्ष या रस्त्याला काहीही होणार नाही. पण गेल्या पंधरा वर्षातच हा रस्ता अत्यंत निकृष्ट प्रतीचा झालेला आहे. महामार्गावरील खड्ड्यांचा निषेध म्हणून आम्ही १३ ऑगस्टला आंदोलन करत आहोत. पक्षीय राजकारण करून आरो लाईनच्या बाजूला असलेले दुकाने सुद्धा हायवेच्या अधिकाऱ्यांकडून पाडली जात आहेत. त्यामुळे हे आंदोलन त्या अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात सुद्धा आहे. शिवसेनेचे जरी हे आंदोलन असले तरी जिल्ह्यातील व्यापारी, जिल्ह्यातील वाहतूकदार या सर्वांना याचा त्रास होत आहे. या आंदोलनानंतर हायवेच्या प्रशासनाला जाग आली नाही तर पुन्हा एकदा गणेशोत्सव नंतर तीव्र आंदोलन छेडले जाईल असे श्री.सावंत यांनी सांगितले.