रामचंद्र कुबल:मालवण तालुका गाबीत समाजातर्फे गुणवंतांचा गौरव..
⚡मालवण ता.२५-:
आजच्या सत्काराने विद्यार्थ्यांवर गाबीत समाजाला पुढे नेण्याचे उत्तरदायित्व आले आहे. मुलांनी करियरची मोठी स्वप्ने बघून ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी, गाबीत समाजातील मुलांनी समुद्रतळ ते अंतराळापर्यंत झेप घेण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन आचरा येथील शिक्षक रामचंद्र कुबल यांनी येथे बोलताना केले.
दहावी आणि बारावी परीक्षा २०२४-२५ मध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ मालवण भरड येथील लीलांजली हॉलमध्ये संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आचरा येथील शिक्षक रामचंद्र कुबल, प्रमुख पाहुणे शिक्षक पांडुरंग कोचरेकर, प्रमुख पाहुणी दिव्या मालंडकर, गाबीत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, संजय केळूसकर, राजीव केरकर, भाई कासवकर, सौ. अन्वेषा आचरेकर, राहुल सारंग, शिक्षिका सौ. संजना सारंग आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रारंभी डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी प्रास्ताविक करून गाबीत समाज संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील गाबित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींनीचा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
राहुल सारंग व दिव्या मालंडकर यांचा विशेष सत्कार
राष्ट्रीय स्तरावरील विविध विज्ञान प्रदर्शनात यश मिळविलेल्या आणि आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या देवगड येथील गाबीत समाजातील राहुल सारंग आणि मर्चंट नेव्ही सारखे खडतर क्षेत्र निवडून त्यामध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या मालवण दांडी येथील दिव्या मालंडकर या दोघांचा गाबीत समाज मालवणतर्फे विशेष सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी राहुल सारंग याने आपली वाटचाल कथन करत आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, विज्ञान क्षेत्रात करियरच्या अमर्याद संधी असून त्यासाठी मेहनत घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर दिव्या मालंडकर म्हणाली, मर्चंन्ट नेव्ही सारख्या क्षेत्रात एक मुलगी म्हणून पुढे जाण्यास आपल्या कुटुंबाने मोठा पाठिंबा दिला, स्वतःवर विश्वास असल्यास कोणतेही ध्येय गाठता येऊ शकते, गाबीत समाज हा समुद्रावर अधिराज्य गाजविणारा समाज असल्याने या समाजातील मुलांनी मर्चंन्ट नेव्ही सारख्या क्षेत्राकडे करियरच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, असेही ती म्हणाली.
यावेळी चंद्रशेखर उपरकर म्हणाले, आज करियरची अनेक क्षेत्र व संधी निर्माण झाल्या आहेत. गाबीत समाजातील प्रत्येक मुलात गुणवत्ता आहे. मुलांना आवड असलेल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी पालक व शिक्षक यांनी मेहनत घेतली पाहिजे, असेही उपरकर म्हणाले. पांडुरंग कोचरेकर यांनी मुलांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, गाबीत समाजात विविध क्षेत्रात यश मिळविलेली मंडळी असून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मुलांनी घ्यावा, असे सांगितले. सौ. संजना सारंग यांनी दहावी व बारावी नंतर काय याबाबत मुलांना मार्गदर्शन झाले पाहिजे, गाबीत समाजातील मुले हुशार असून त्यांनी स्वतःचे ध्येय ठरवले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी रामचंद्र कुबल म्हणाले, दहावी, बारावी नंतरचा काळ हा विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घेऊन अभ्यास करावा. मुलांनी स्वावलंबी बनले पाहिजे. शारीरिक ठेवण, उत्तम आरोग्य आणि उत्तम मानसिक स्थिती ठेवण्यासाठीही विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. मोबाईल आणि विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी आणि विकासासाठी करावा, असेही श्री. कुबल म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पराडकर यांनी केले. आभार सौ. अन्वेषा आचरेकर यांनी मानले. यावेळी गाबीत समाजातील बांधव, भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.