⚡मालवण ता.२७-:
कट्टर राणे समर्थक दत्ता सामंत यांनी काल रात्री मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असतानाच शिवसेना नेते , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना ( शिंदे गट )पक्षाच्या कुडाळ- मालवण व कणकवली विधानसभा कार्यक्षेत्रासाठी जिल्हाप्रमुख पदी दत्ता सामंत यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी सामंत यांना प्रदान केले.
लोकसभा निवडणुकीनंतर गेले काही महिने राजकारणापासून काहीसे अलिप्त झालेले भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या बाबत अनेक राजकीय अफवा उठत असताना काल दत्ता सामंत यांनी कणकवली येथे राणे कुटुंबियांची भेट घेत आपली कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत निलेश राणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे राजकीय अफवाना पूर्णविराम मिळाला होता. याच दरम्यान दत्ता सामंत हे शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त पसरले असताना काल रात्रीच मुंबई येथे दत्ता सामंत यांनी आपल्या बहुसंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपास्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे शिवसेनेत दत्ता सामंत यांना मोठे पद मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी दत्ता सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्ता सामंत यांना कुडाळ मालवण व कणकवली विधानसभा कार्यक्षेत्र देण्यात आले आहे.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी श्री सामंत यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या कुडाळ व कणकवली विधानसभा मतदार संघाच्या जिल्हाप्रमुख पदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल, तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. हे नियुक्तीपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दत्ता सामंत यांना सुपूर्द केले.
