मालवणात आयोजित शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२७-: विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलाच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष असणाऱ्या विविध शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन मालवण मधील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाले. या प्रदर्शनाला शिवप्रेमी नागरिक व शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर यानिमित्त नाट्यगृहात अभयराजे जगताप यांचे ‘छत्रपती श्री शिवराय झाले नसते तर ‘ या विषयावर व्याख्यान सादर झाले.

या प्रदर्शनाचे उदघाटन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी शिवशंभू विचारमंचाचे कोकण संयोजक अभयराजे जगताप, मुंबई संयोजक प्रमोद काटे, ठाणे संयोजक पंकज भोसले, भाऊ सामंत, बबन परुळेकर, श्रीराज बादेकर, गणेश चव्हाण, तेजस चव्हाण, देविदास परब, प्रसाद हळदणकर, पार्थ डीचवलकर, पार्थ मेस्त्री, स्वानंद सामंत यांसह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रदर्शनात शास्त्रास्त्रे, शिवकालीन नाणी, मोडी लिपीतील ऐतिहासिक दुर्मिळ पत्रे, तसेच शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या छायाचित्रांचा समावेश होता. तसेच भारतीय टपाल खात्याने प्रकाशित केलेले काही विशेष लिफाफे व पोस्टल तिकीट देखील याठिकाणी मांडण्यात आली होती. यावेळी अभयराजे जगताप यांनी उपस्थितांना शस्त्रांबद्दल माहिती दिली. तर सायंकाळी अभयराजे जगताप यांच्या व्याख्यानासही शिवप्रेमीनी उपस्थित राहत प्रतिसाद दिला.

You cannot copy content of this page