मालवण दि प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरा पंचक्रोशीचा २०२४ चा मानाचा ज्येष्ठ सेवा पुरस्कार आचरे बौद्धवाडी येथील लक्ष्मणराव भिवा आचरेकर यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून १ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री देव रामेश्वर मंदिर आचरे येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अध्यक्ष अशोक कांबळी यांनी दिली.
हा कार्यक्रम आचरे रामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई चे कार्याध्यक्ष प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे . लक्ष्मणराव आचरेकर हे ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे या संस्थेचे संस्थापक सदस्य म्हणून गेली दीड तप संघाची सेवा तन मन धन अर्पण करून करीत आहेत. जवळ जवळ एक तप संघाचे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषवून संघाची सेवा केलेली आहे. गेली ६ वर्षे ते ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरेच्या सल्लागार समितीवर असून संघाला सदैव मार्गदर्शन करीत आहेत. ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरेचा ‘स्वरयात्रा’ हा उपक्रम गेली १४ वर्षे राबवून त्यांनी संघाची ‘स्वरसेवा’ केलेली आहे. तर गेली २२ वर्षे वैभवशाली श्री देव रामेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आचरा व श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड आचरा येथे दहा वर्षे सेवा देत आहेत. संगीत, नाट्य, गायन, वादन आदी विभागात वयाची 85 वर्षे पार करूनही त्यांची सेवा अजूनही निरंतर चालू आहे.
या वेळी संघातील ४५ वर्षे पूर्ण केलेल्या दांपत्यांचा आणि ७० वर्षे पूर्ण केलेल्या मनोयुवांचा सत्कार आयोजित केला आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक सेवासंघ आचरे पंचक्रोशीचे कार्यवाह जकारीन फर्नांडिस यांनी केले आहे.
