मळगाव येथील राऊळ व गावकर घराण्यातील महिलांचा गौरी पूजन कार्यक्रम उत्साहात…

७५० वर्षांची परंपरा : सायंकाळी गौरीचे विसर्जन…

⚡सावंतवाडी ता.१३यसहदेव राऊळ-: चक्क ७५० वर्षांची परंपरा असलेल्या मळगाव येथील देवस्थानचे मानकरी असलेल्या राऊळ (कुळ) व गावकर (थळ) घराण्यातील सौभाग्यवती महिलांचा एक दिवसीय गौरी पूजन, व्हवसा कार्यक्रम गणेश चतुर्थीच्या सहाव्या दिवशी परंपरेनुसार उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सायंकाळी गौरीचे थाटात विसर्जन करण्यात आले.
गणेश चतुर्थीप्रमाणे गौरी पूजनालाही तेवढेच महत्त्व आहे. प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे गौरी देवी पूजनाचा कार्यक्रम एक, दोन व तीन दिवस चालतो. त्यानुसार मळगाव येथील राऊळ व गावकर घराण्यातील महिलांचा एक दिवसीय गौरी पूजन कार्यक्रम सोमवारी पार पडला. सकाळी ढोलांच्या गजरात विहिरीवरून कुमारीका मुलीला घेऊन गौरीला थाटात दोन्ही ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर गौरीला नटवून साडी नेसवून तिचे पुरोहिताच्या साक्षीने विधिवत पूजन करण्यात आले. महिलांनी व्हवसा देवीसमोर मांडून आपला व्हवसा भरण्याचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी नवीन लग्न झालेल्या महिलांना पहिला मान दिला जातो. त्यानुसार नवोदित जोडप्यांचा व्हवसा भरणे कार्यक्रम प्रथम पार पडला. त्यानंतर उर्वरित महिलांचा व्हवसा भरणे कार्यक्रम झाला. सर्वांच्या उपस्थितीत महाआरती व गाऱ्हाणे पार पडले. त्यानंतर सर्व राऊळ घराण्यातील महिलांनी वाजतगाजत ढोलांच्या गजरात येथील गावकर घराण्यातील गौरीचे दर्शन घेतले, तर गावकर घराण्यातील महिलांनी राऊळ घराण्यातील गौरीचे दर्शन घेतले. नंतर परत आपापल्या ठिकाणी आल्यावर उपस्थित सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर देवीसमोर महिलांनी विविध प्रकारच्या फुगड्या सादर केल्या. सायंकाळी ढोलांच्या गजरात गौरीचे थाटात विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर शेगलाची भाजी व भाकरी असा प्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर सामूहिक गाऱ्हाणे झाल्यावर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

You cannot copy content of this page