मालवण शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेकडून सूचना जारी…

*💫मालवण दि.०८-:* वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या अधिसूचनेनुसार मालवण शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मालवण नगरपालिका उपाययोजना राबवत असून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने काही सूचना जारी केल्या आहेत. शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, हातगाडी फळविक्रेते, भाजी विक्रेते, मच्छीविक्रेते, स्टॉलधारक व त्यांच्या आस्थापनेवर काम करणारे सर्व कर्मचारी, कामगारांनी नगरपालिकेच्या अल्पबचत हॉल येथील कोविड-१९ तपासणी केंद्रात सकाळी दहा ते एक, दुपारी तीन ते चार यावेळेत आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी, अशा सूचना नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केल्या आहेत. शहरातील नागरिकांनी कोविड-१९ चा प्रतिबंध करण्यासाठी सामाजीक अंतर, मास्कचा वापर व खबरदारीच्या इतर सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नगरपालिका प्रशासनाने मामा वरेरकर नाट्यगृह याठिकाणी लसीकरणासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालय येथेही लसीकरणाची सुविधा आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे. शहरातील कोरोना रुग्ण मयत झाल्यास नगरपालिकेतर्फे अंत्यविधीसाठी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याठिकाणी कोरोना रुग्ण आढळून येतो त्याठिकाणी कन्टेंमेंट झोन करून सॅनीटायझर औषधाची फवारणी करण्यात येत आहे. कन्टेंमेंट झोन असलेल्या कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. संबंधित व्यक्ती घराबाहेर फिरताना आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बाजारपेठेत मोक्याच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी बेरीकेटस् लावले आहे. त्या भागात नागरिकांनी वाहन प्रवेश करू नये. शहरातील सर्व दुकानदारांनी सकाळी सात ते अकरा यावेळेतच आपली दुकाने उघडी ठेवावीत. नियमांचे जे वारंवार उल्लंघन करतील त्यांची दुकाने, आस्थापना सील करून पुढील आदेश होईपर्यत बंद करण्यात येईल. यासाठी नगरपालिकेचे स्वतंत्र पथकही नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी दिली.

You cannot copy content of this page