बेपत्ता मच्छिमाराचा मृतदेह अलिबाग किनारी सापडला…

⚡मालवण ता.२१-:
तळाशील खाडीपात्रात मासेमारी होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय ५५) या मच्छिमाराचा गेले काही दिवस शोध सुरु असताना तब्बल १३ दिवसांनी तळाशील पासून सुमारे ४०० कि.मी. अंतरावर असलेल्या थेरोंडा बाजारपेठ ता अलिबाग या किनाऱ्यावर त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळून आला आहे. चोडणेकर यांच्या अंगावरील टीशर्ट वरून त्यांची ओळख पटली असल्याची माहिती मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

मालवण तालुक्यातील तळाशील येथील किशोर महादेव चोडणेकर (वय-५५) हे ८ जुन रोजी मुलगा लावण्य किशोर चोडणेकर (वय १४) वर्षे आणि खलाशी धोंडीराज परब (वय ५५ वर्षे, रा. तारकर्ली) यांच्यासह तळाशील खाडीमध्ये छोटी होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. हे मच्छीमार सर्जेकोट तळाशील येथे मच्छीमारी करत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पाऊस व वाऱ्यामुळे होडी उलटून तीनही जण समुद्रात बुडाले. लावण्य हा पोहत किनाऱ्यावर आल्याने तो बचावला. तर बुडून बेपत्ता झालेल्या दोघांपैकी धोंडीराज परब यांचा मृतदेह घटनेच्या दुसऱ्या दिवशी सापडला. मात्र किशोर यांचा अद्यापही शोध लागला नव्हता. स्थानिक ग्रामस्थ, शोध पथक, पोलीस तसेच प्रशासन यंत्रणा, कोस्ट गार्ड हॅलीकॉप्टर तसेच जिल्हा पोलीस प्रशासन टीमने ड्रोन द्वारे त्यांची शोध मोहीम घेतली होती.

दरम्यान, काल सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास थेरोंडा बाजारपेठ ता अलिबाग या समुद्रकिनारी अज्ञात मृतदेह मिळून आला. या मृतदेहाच्या अंगावर असलेल्या टी शर्टवर घाटकोपर भटवाडी साईदर्शन असा उल्लेख असल्याने हा फोटो घाटकोपर मध्ये व्हायरल झाला. त्यानंतर केलेल्या अधिक चौकशीत हा मृतदेह तळाशील खाडीत बुडालेल्या किशोर चोडणेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

You cannot copy content of this page