आर्मी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मालवणात योग दिन कार्यक्रम संपन्न…

⚡मालवण ता.२१-: एनसीसीचे ५८ महाराष्ट्र बटालियन व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण एन. सी. सी. विभाग यांच्या वतीने आज सकाळी मालवण बंदरजेटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. मालवण समुद्र किनारी आणि ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला साक्षी ठेवत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात आर्मी व एनसीसी ऑफिसर, विद्यार्थी, शिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तज्ज्ञ योग साधकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योग प्रात्यक्षिके केली.

या कार्यक्रमात प्रारंभी स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय छात्रसेना विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. एम. आर. खोत यांनी उपस्थित मान्यवरांचा परीचय करुन दिला व त्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले. मानवी जीवनात योग साधनेचा फायदा हा शारिरीक व मानसीक तंदुरुस्तीसाठी महत्वाचा आहे असे प्रा. एम. आर. खोत यांनी स्पष्ट केले. यावेळी ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, सुभेदार मेजर दिनेश गेडाम, मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी योगशिक्षिका सौ. सिद्धिश्री माणगांवकर व त्यांच्या सहकारी सौ. केतकी सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या व बैठक स्थितीत विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सिद्धिश्री माणगांवकर यांनी या दरम्यान प्रत्येक आसनाची तंत्रशुद्ध पद्धत व महत्व समजावून सांगितले. शेवटी प्रा. खोत यांनी आभार मानले.

या कार्यक्रमात आर्मी अधिकारी एच. एम. गुरुजीवन सिंग, शाहू सर, सुभेदार चंद्रसिंग, पूर्णचंद्र बेहरा, नरेशकुमार यांच्यासह डाॅ. राहुल पंतवालावलकर व रोटरी क्लब व लायन्स क्लब ऑफ मालवणचे सदस्य, साहित्यिका वैशाली पंडित, मातृत्व आधार फाऊंडेशनचे पदाधिकारी दादा वेंगुर्लेकर, माय माऊली संस्थेच्या संस्थापक फॅनी फर्नांडिस व सदस्य, नंदू देसाई, किसन मांजरेकर, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सौ. सविता देऊलकर तसेच नगरपालिका व इतर विभागाचे प्रशासकिय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, प्राध्यापक वर्ग, एन. सी. सी. विद्यार्थी विद्यार्थिनी, कट्टा येथील वराडकर प्रशालेचे विद्यार्थी, मालवण मधील योगप्रेमी नागरिक आदी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page