शशांक बावचकर:इंडिया आघाडीची कुडाळला बैठक;रमेश किर २१ जून ला सिंधुदुर्गात..
⚡कुडाळ ता.१८-: गेल्या दहा वर्षात बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे पदवीधरांच्या समस्या देखील वाढल्या आहेत. भाजपच्या उमेदवाने त्याकडे कानाडोळाच केलेला आहे. त्यांच्याबद्दल कोकणात नाराजी आहे. त्यामूळे कोकण पदवीधर मतदार संघात इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश किर हे नक्की निवडून येतील असा विश्वास कोकण पदवीधर मतदार संघाचे सह समन्वयक शशांक बावचकर यांनी व्यक्त केला. कुडाळ इथं आज इंडिया आघाडीची आढावा बैठक झाली त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे इंडिया आघाडीच्या पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पडते, सुशांत नाईक, साईनाथ चव्हाण, प्रसाद बांदेकर मंदार शिरसाट, विजय प्रभू, अभय शिरसाट, सुगंधा साटम व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. बावचकर म्हणाले की, राज्यातील युती सरकारच्या विरोधात लोकसभा निकालातून लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यात बेरोजगारी वाढली असून सामान्य पदवीधरामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षात येथील पदवीधर आमदाराने मतदार व जनतेच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत त्यामुळे यावेळी इंडिया आघाडीचे कोकण पदवीधर मतदार संघातील उमेदवार रमेश किर हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील .
कोकण पदवीधर मतदार संघांची निवडूणक 26 जून रोजी होत आहे. इंडिया आघाडीच्या वतीने रमेश किर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी समन्वयक म्हणुन सतेज पाटील असून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात येत आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यात २ लाख १८ हजार मतदार असून सिंधुदुर्गात १८ हजार ५०० मतदार आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस, युवा सेना, राष्ट्रवादी यांनी मोठ्या प्रमाणावर पदवीधरांची नोंदणी केली आहे. त्यामुळे आमचा उमेदवार विजयी होण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे श्री. बावचकर म्हणाले.
मोदी सरकार विरोधात तीव्र नाराजी आहे. त्यामुळे ते भाजपा बहुमत मिळवू शकले नाहीत इतर पक्ष फोडून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या निकालातून लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत सर्व पक्षांनी संघटीतपणे काम करून श्री. किर यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करूया. यापुर्वीच्या आमदारांनी या मतदार संघात काम न केल्याने त्यांच्या विरोधात नाराजी आहे असे श्री. बावचकर यांनी सांगितले. यापूर्वी झालेल्या बैठकीत पदवीधर मतदार संघासाठी कशा पध्दतीने मतदान करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान कोकण पदवीधर मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे उमेदवार रमेश किर हे २१ जूनला सिंधुदुर्गचा दौरा करणार असल्याच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले. श्री. किर यांनी दोन दिवसापूर्वी देवगड, राजापूर भागाचा दौरा केला होता. १२ जून रोजी श्री. किर यांची उमेदवारी अंतिम स्वरूपात आली आणि त्यानतंर खूप कमी दिवसांत पाच जिल्हे कव्हर करायचे आव्हान त्यांच्या समोर आहे. तरी सुद्धा येतेय २१ जून रोजी ते सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले वगैरे भागात दौरा करणार असल्याचे श्री. शेख म्हणाले. .
