रात्री पावणे नऊची घटना: मोटरसायकलस्वार जखमी..
⚡मालवण ता.२७-: मालवण देऊळवाडा येथील धोकादायक उतारावर डंपर आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकलचा चक्काचूर होतानाच मोटरसायकलस्वार दीपक बापू गांगनाईक (वय ३४, रा. सोमवार पेठ मालवण) हे जखमी झाले. हा अपघात आज बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.
दरम्यान गोव्याहून मालवणात येणाऱ्या डंपरची वर्दळ वाढली असून भरधाव वेगाने येणारे डंपर खाडी पट्ट्यातील वाळू भरून नेण्यासाठीच मालवणात येतात अशी खुले आम चर्चाही या अपघातानंतर सुरु होती.
मिळालेल्या माहितीनुसार कुंभारमाठहुन मालवणच्या दिशेने जाणारा मोटरसायकलस्वार आणि मालवणच्याच दिशेने जाणारा गोव्याचा डंपर या दोन वाहनांमध्ये आज रात्री अपघात घडला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने दीपक बापू गांगनाईक या मोटरसायकलस्वार बालबाल बचावला. यावेळी स्थानिक नागरिकांनी दीपक यास जखमी अवस्थेतच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातानंतर डंपर चालकाला स्थानिकांनी चांगलाच प्रसाद दिल्याचे वृत्त आहे. या अपघातानंतर मालवण कसाल हमरस्त्यावरून ये – जा करणारे डंपरही स्थानिकांनी अडवले होते .
अलीकडच्या काळात गोव्याहून मालवणात येणाऱ्या डंपरची वर्दळ वाढली असून यातील काही डंपर कालावल खाडी पट्ट्यातील बेकायदेशीर उपसा केलेल्या वाळूची वाहतूक करण्यासाठी येतात आणि भरधाव वेगाने डंपर हाकतात. या पूर्वीही या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडले असतानाही पोलीसात जाण्याअगोदरच अशी प्रकरण सामोपचाराने मिटविली जातात, अशी चर्चाही अपघातानंतर सुरु होती.
