मुक्ति आरोलकर-देसाई यांचा विश्वास..
⚡बांदा ता.२३-: पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचे सक्षमीकरण होणे ही काळाची गरज आहे. महिलांना आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या प्रबळ करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊनच मांद्रे मतदारसंघात महिलांसाठी विविध गृहउद्योग राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता महिलांना भविष्यात बाजारपेठे देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मांद्रे मतदारसंघातील महिलांना स्वावलंबी बनविणार असल्याचा विश्वास आमदार जीत आरोलकर यांच्या भगिनी मुक्ती आरोलकर-देसाई यांनी विरनोडा येथे व्यक्त केला.
मांद्रे मतदारसंघातील प्रत्येक गावातील महिलांसाठी गृहउद्योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच विरनोडा येथे महिलांसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुक्ती आरोलकर-देसाई बोलत होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांना संघटित होऊन स्वकर्तृत्वावर उभे राहण्याचे आवाहन करत यासाठी आपण सर्वतोपारी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
श्रीमती आरोलकर-देसाई पुढे म्हणाल्या की, गोवा राज्य आज पर्यटन दृष्टिकोनातून संपन्न आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व क्षेत्रांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क व दर्जा प्रदान करून देणे, विकासाठी संधी उपलब्ध करून देणे, आणि स्त्री-पुरुष असमानता नष्ट करणे या उद्देशानेच महिला सक्षमीकरण करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. ‘चूल आणि मुल’ या पारंपारिक जाचात महिलांनी न अडकता आपल्यातील कौशल्याचा वापर करून त्यांना हक्काची बाजारपेठे मिळवून देण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. महिलांमधील ही गृह कला जगासमोर आणण्यासाठी महिलांनी या शिबिराचा फायदा करून घ्यावा. आज गोव्यातील महिला या पर्यटनाबरोबरच गृह उद्योगातून देखील आर्थिक व सामाजिक सक्षमता निर्माण करू शकतात. महिलांची ही ताकदच त्या सक्षम असल्याचे प्रतीक आहे. विरनोडा येथे पापड मेकिंग शिबीर संपन्न झाले. मांद्रे मतदारसंघातील प्रत्येक गावात असे शिबीर घेण्यात येणार आहे. या मतदारसंघातील प्रत्येक महिला ही स्वावलंबी व्हावी यासाठी आपला प्रयत्न आहे.
मांद्रे मतदारसंघातील ९ गावांमध्ये टप्प्याटप्प्याने हे प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येणार आहे. यासाठी नियोजन सुरु असल्याचे यावेळी श्रीमती आरोलकर-देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी सुमन आरोलकर उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले.
