Headlines

महिलांनी कायदा व संविधान समजून घेणे आवश्यक…

ऍड. देवदत्त परुळेकर:सिंधुदुर्ग महाविद्यालयातील कायदेविषयक अभ्यासक्रमाचा समारोप.

⚡मालवण ता.२०-: कायद्याचा आपल्याला वेळोवेळी वापर करावा लागतो, त्यामुळे तो समजून घेणे गरजेचे आहे. तसेच जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला, मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे भारतात महिलांना लगेच मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे संविधानही समजून घेणे आवश्यक आहे, असे मत बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी येथे मांडले.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय आणि बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘महिलाविषयक कायदे या मूल्यवर्धित अभ्यासक्रमाचा समारोप नुकताच महाविद्यालयाच्या नरहरी प्रभूझांट्ये सभागृहात झाला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ऍड.परुळेकर बोलत होते.

या अभ्यासक्रमातील मार्गदर्शक ऍड. प्राची कुलकर्णी यांनी सिंधुदुर्ग महाविद्यालयातील शिक्षक हे विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर महत्वाच्या बाबींचे शिक्षण देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात त्यामुळे महाविद्यालयाचा गुणवत्ता स्तर उंचावलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून घ्यावा, असे सांगितले. ऍड. प्राजक्ता गावकर यांनी आम्हाला विद्यार्थ्यांशी या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने संवाद साधण्याची संधी मिळाली आणि विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला, असे सांगितले.

सहभागी विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. यातील गुणवान विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम महेक शेख, द्वितीय विभागून आश्लेषा ठाकुर, पूर्वा कीर्तने, काजल वाघ, तृतीय-विभागून निकिता शर्मा, मेगल डिसुझा, दीक्षिता जोशी, हर्षाली कांदळगावकर, भाग्यश्री मालंडकर, भार्वी शिर्सेकर.

अभ्यासक्रमात व्याख्याने देणाऱ्या सर्व मार्गदर्शक महिला वकिलांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयातर्फे ऍड. देवदत्त परुळेकर आणि शैलेश खांडाळेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. शिवराम ठाकुर यांनी अभ्यासक्रम राबविण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगणने केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. सहभागी व गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. महिला विकास कक्ष समन्वयक डॉ. सुमेधा नाईक यांनी अभ्यासक्रम महाविद्यालयाने दरवर्षी राबवावा, असे आवाहन केले. महिला विकास कक्षातर्फे अभ्यासक्रम समन्वयक डॉ. उज्वला सामंत यांना गौरविण्यात आले.

स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद खरात यांनी केले. आभार डॉ. उज्वला सामंत यांनी मानले. यावेळी व्यासपीठावर ऍड. प्राजक्ता गावकर, ऍड. सोनल पालव, ऍड. काजल झाड, ऍड. प्राची कुलकर्णी, ऍड. पूजा शेडगे, ऍड. उर्मिला आचरेकर, ऍड. मानसी चव्हाण तसेच विद्यार्थी प्रतिनिधी शुभम सकपाळ तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. उर्मिला मेस्त्री, प्रा. रश्मी राऊळ, प्रा. नमिता राणे, मेगल डिसुझा, श्रेया अटक यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page