⚡कणकवली ता.१८-: ओसरगाव पटेलवाडी येथील महामार्गाने रस्ता ओलांडत असताना कारने धडक दिल्याने पादचारी श्रीधर गुणाजी सर्पे (६५, रा. कसवण बौद्धवाडी) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक प्रशांत शंकर कांबळे (२३, रा. आवळीबुद्रुक राधानगरी) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद मयत यांचा मुलगा ओमकार श्रीधर सर्पे याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
ओसरगाव पटेलवाडी बस स्टॉप येथील रस्त्यावरून श्रीधर सर्पे हे दुसऱ्या बाजूस जात होते. त्यादरम्यान कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारची श्रीधर सर्पे यांना धडक बसली. यात सर्पे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे कारचालक प्रशांत कांबळे याने कारमधून जखमी श्रीधर सर्पे यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर श्रीधर सर्पे यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना श्रीधर सर्पे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे करत आहेत.
