ऍड सिध्दी जीत आरोलकर यांचे आवाहन..
⚡बांदा ता.१६-: आज सर्वच क्षेत्रात स्त्री ही आघाडीवर आहे. तिने आत्मसात केलेल्या ज्ञानाचा योग्य वापर करून आपली संस्कृती जपल्यास स्त्री ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनेल. तिला सक्षम होण्यासाठी समाजाने देखील पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ॲडव्होकेट सिद्धी जीत आरोलकर यांनी तोरसे येथे केले.
तोरसे पेडणे येथील प्रगती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महिला दिन कार्यक्रमात ॲडव्होकेट आरोलकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजप महिला मंडळाच्या सचिव उषा नागवेकर, माजी सरपंच प्रार्थना मोटे, प्राचार्या डॉ. अनिता जावे, कार्यक्रम प्रमुख सुवर्णा खेडेकर, उपप्रचार्य बि. डि. पाटील, प्रा. सुबोध मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सौ. नागवेकर म्हणाल्या की, एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला आधार देण्याचा आणि साथ देण्याचा निच्छय करावा तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण होईल. सौ. मोटे म्हणाल्या की, आजची स्त्री ही जबाबदार व कर्तबगार होत आहे. चांगला समाज घडविण्यासाठी स्वतःच्या मुलांना चांगल्या संस्कारांचे बाळकडू देण्याचे काम स्त्रीने करायला हवे.
यावेळी वर्षभरात महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चेतना नाईक, आफरा शेख, समृद्धी केळकर या विद्यार्थिनींनी काव्यवाचन केले. विद्यार्थिनी शांभवी जोशी आणि पूर्वी चोडणकर यांनी आपल्या मनोगतातून स्त्री दिनाचे महत्व सांगितले. फाईन आर्ट प्राध्यापिका सिद्धी नाईक यांनी बासरी वादन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जावे यांनी केले. प्रा. शलाका देसाई यांनी स्वागत केले. प्रा. सुवर्णा खेडेकर यांनी आभार मानले.
