कुडाळ छ. शिवाजी महाराजनगरातील कचराप्रश्र्नी नगरसेवक अभिषेक गावडे ऑनफील्ड…

रस्त्यालगत कचरा टाकणाऱ्यांना
सुनावले खडेबोल:पुन्हा कचरा टाकल्यास संबंधितावर होणार कारवाई..

⚡कुडाळ ता.२३-: कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. ५ छत्रपती शिवाजी महाराजनगर येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. याबाबत स्थानिक भाजप नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कुडाळ नगरपंचायतच्या कचरा सफाई विभागाशी संपर्क साधून येथील कचरा ताबडतोब बाजूला केला.
कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. ५ छत्रपती शिवाजी महाराजनगर हा भाग बाजारपेठ असून येथे परप्रांतीय व्यापारी वर्गाची कपड्यांची दुकाने आहेत. तसेच या भागात निवासी संकुले असल्याने यातील नागरिक गोळा होणारा कचरा येथील विद्युत डीपीच्या बाजूला टाकतात. मुख्य म्हणजे कुडाळ नगरपंचायतची कचरा घेणारी घंटागाडी या भागात येते. मात्र, येथील नागरिक आणि परप्रांतीय व्यावसायिक कचरा घंटागाडी आल्यावर न देता
विद्युत डीपीच्या बाजूला टाकतात. त्यामुळे या भागात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली. याबाबत स्थानिक भाजप नगरसेवक अभिषेक गावडे यांना टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याबद्दल माहिती मिळाली. नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तत्काळ घटनास्थळी हजेरी लावली. तसेच तत्परता दाखवीत कुडाळ नगरपंचायतीच्या घंटागाडीस बोलावून तेथील कचरा भरून मार्गस्थ केला.
याबाबत नगरसेवक अभिषेक गावडे यांनी या छत्रपती शिवाजी महाराजनगरातील व्यापारी वर्गाशी संवाद साधत कचरा उघड्यावर न फेकता नगरपंचायतच्या घंटागाडीवर द्या, असे आवाहन केले. तसेच यापुढे रस्त्याच्या बाजूला उघड्यावर कचरा टाकल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजनगरात सीसीटीव्ही लावण्यात येणार असून यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष राहील, असेही नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्पष्ट केले. मुख्य म्हणजे वॉर्ड ५ चे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कचराप्रश्र्नी दाखविलेल्या तत्परतेबद्दल स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी त्यांचे कौतुक केले.

कचरास्थळी लावण्यात आलेला बॅनर चर्चेत
दरम्यान, नगरसेवक अभिषेक गावडे यांनी कचरा फेकणाऱ्याना जरब बसावी म्हणून एक बॅनर या ठिकाणी लावला आहे. “होय !, मी मूर्ख आहे !!! कारण, इथे नेहमी कचरा टाकतो …” अशा आशयाचा बॅनर कुडाळ शहरात चर्चेचा बनला आहे. कारण, समाज विकृत लोकांना समज देण्यासाठी नगरसेवक अभिषेक गावडे यांनी जालीम उपाय योजला, अशी चर्चा आहे.

You cannot copy content of this page