२३,९१६ मतदारांना वगळले:जिल्हाधिकारी किशोर तावडे
⚡ओरोस ता.२३-: १ जानेवारी २०२४ च्या अहर्ता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ९ हजार ३४९ मतदारांची नव्याने भर पडली आहे. तर मयत, स्थलांतरित होणे, या कारणाने २३ हजार ९१६ मतदार वगळण्यात आले आहेत. यामुळे ६ लाख ५७ हजार ७७१ एवढे मतदार प्रारूप मतदार यादीत निश्चित झाले आहेत. विशेष म्हणजे १८ ते १९ वयोगटातील ३ हजार २७४ मतदारांची नोंद झाल्याने एकूण टक्केवारीत या गटातील ०.३७ टक्के असलेला समावेश वाढून तो ०.८७ टक्के झाला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिली.
याबाबत माहिती देण्यासाठी तावडे यानी आपल्या दालनात मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी तावडे यानी, यावर्षी राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पाश्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्यावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत दुबार, स्थलांतरित व मयत मतदारांची वगळणी करण्यात आली, असे यावेळी जिल्हाधिकारी तावडे यानी सांगितले.
