बांदा/प्रतिनिधी
चिपळूण येथील रोट्रॅक्ट क्लबने आयोजित केलेल्या महोत्सवात बांदा येथील सुप्रसिद्ध अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपच्या कलाकारांनी विविध स्टॅच्यू सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. ग्रुपला मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून आरती निराधार सेवा फौंडेशन (दिव्यांग मुलांचे उद्योगकेंद्र ) येथील मालघर गुरुकुल प्रशाळेतील २१ निराधार व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यापूर्वी देखील ग्रुपने असे विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. ग्रुपच्या सदस्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला. यापूर्वी चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक शाळेत देखील शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी ग्रुपचे संयोजक मनोज कल्याणकर, प्रशांत सावंत, उर्वेश पावसकर यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संकेत लाड व निलेश आवले यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी बोलताना मनोज कल्याणकर म्हणाले की, ग्रुपच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात विविध स्टॅच्यू सादर केले जातात. या कलेला रसिकाकडून देखील प्रोत्साहन मिळते. यावेळी गोळा होणाऱ्या प्रोत्साहन रकमेतून विविध सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतला. याच माध्यमातून आम्ही निराधार व्यक्तींना साहित्य उपलब्ध करून दिले. भविष्यात देखील शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
फोटो :-
चिपळूण येथे निराधार व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करताना मनोज कल्याणकर, प्रशांत सावंत व उर्वेश पावसकर. सोबत इतर.
