जागतिक मत्स्यविकास परिषदेत मालवणी खाद्यपदार्थांचा दरवळ…

मालवणातील महिलांच्या मालवणी फूड स्टॉलला सर्वांची पसंती..

⚡मालवण ता.२८-: गुजरात-अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे झालेल्या जागतिक मत्स्यविकास परिषदेत महाराष्ट्रातून मालवणच्या सौ. मिताली प्रशांत कोरगावकर यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या गटाने सादर केलेल्या मालवणी मत्स्य जेवणाचे सर्वांनी कौतुक केले. केंद्रीय मत्स्यविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांच्यासह अनेक मान्यवरांनी कोरगावकर यांच्या मिताली मालवणी फूड स्टॉलला भेट देऊन सर्वांची प्रशंसा केली. या स्टॉलमुळे मालवणी पद्धतीच्या जेवणाची व विविध खाद्य पदार्थांची चव सर्वांना चाखता आली.

२१ नोव्हेंबर रोजी जागतिक मच्छीमार दिनाचे औचित्य साधून अहमदाबाद येथे दोन दिवसीय मत्स्य विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घानप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, केंद्रीय मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि डॉ. संजीवकुमार बल्यान यांच्यासह दहा देशांचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ, आंतरराष्ट्रीय संस्था, मत्स्य व्यवसाय संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सिंधुदुर्गचे सहाय्यक मत्स्यविकास आयुक्त एस. एस. अलगिरी यांनी मालवण – आचरा येथील सौ. मिताली (स्वाती) कोरगावकर यांच्या नेतृत्वाखालील ग्रुपला जागतिक मत्स्यविकास परिषदेत मालवणी जेवणाचा स्टॉल उभारण्याची संधी दिली होती. महाराष्ट्रातून अशा प्रकारच्या पाच स्टॉलना संधी देण्यात आली होती. मिताली कोरगावकर यांच्या मिताली फूड स्टॉलमध्ये वैष्णवी किर, शुभांगी वराडकर, तारामती कोचरेकर, पुष्पलता जाधव, सीमा घाडीगावकर, पूजा निकम उर्फ रेखा गावकर, गौरी कोरगावकर, मोलाई साकेत, पंकज घारे आदींचा सहभाग होता. मुंबई उपनगरचे मत्स्यविकास परवाना अधिकारी संजीवकुमार साबळे यांचे मोलाचे सहकार्य टीमला लाभले.

मालवणी खाद्यपदार्थांना सर्वांची पसंती

या मालवणी फूड स्टॉलला सर्वांची पसंती मिळाली. याबाबत मिताली कोरगावकर म्हणाल्या, परिषदेत देशभरातील सर्व सागरी राज्यांचे फूड स्टॉल सहभागी झाले होते. यात आमच्या स्टॉलवरील मालवणी तिखलं, कोळंबी, सुरमई, बांगडा, पापलेट फ्रायला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मत्स्य खाद्य पदार्थारोबरच खवय्यांना सोलकढी आणि उकडीचे मोदकही विशेष आवडले. सोलकढी बनविण्याची पद्धत खवय्यांनी जाणून घेतली, असेही कोरगावकर यांनी सांगितले.

करवंटीच्या वस्तुही ठरल्या आकर्षण

तसेच मालवणी खाद्याबरोबरच कोकणातील कला समोर आणण्याच्या दृष्टीने मिताली कोरगावकर यांनी मालवण येथील भूषण मेतर यांनी नारळाच्या करवंटीपासून बनविलेल्या विविध वस्तू स्टॉलवर सादर केल्या होत्या. या वस्तूही सर्वांच्या पसंतीस पडल्या. टाकाऊतून टिकाऊ या धर्तीवर बनविलेल्या या वस्तू नावीन्यपूर्ण असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करत कौतुक केले.

केंद्रीय मत्स्यविकास मंत्र्यांकडून प्रशंसा

यां मत्स्य विकास परिषदेतील मिताली मालवणी फूड स्टॉलला केंद्रीय मत्स्यविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी भेट देऊन सर्वांची प्रशंसा केली. स्टॉलवर सर्व मत्स्य खाद्य पदार्थांची मांडणी आणि एकूणच सादरीकरण आकर्षक झाल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page