⚡वेंगुर्ल ता.२७-: तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरीचा जत्रोत्सवानिमित्त विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहत श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला सुख समाधान प्राप्त होवो. राज्यातील नागरिक शेतकरी, शेतमजूर, कामगार व आमचे सर्व साथी असतील या सर्वांना उदंड आयुष्य लाभून या राज्यात अत्यंत गौरवशाली क्षण येऊदे अशी प्रार्थना त्यांनी श्री देवी सातेरी चरणी केली.
वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी २६ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या जत्रोत्सवाला वडील सुरेश नार्वेकर, आई, पत्नी व आपल्या कुटुंबासमवेत उपस्थित राहत श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. यावेळी सर्वप्रथम मातोंड गावकर मंडळी यांच्यावतीने पश्चिम देवस्थान कमिटीचे माजी सदस्य हिरोजी उर्फ दादा परब यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख गावकर उदय परब, रमाकांत परब, तुकाराम परब, दादा परब- म्हालटकर, सुधाकर परब, दीपक परब, जयवंत परब यांच्यासाहित इतर गावकर मंडळी, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच आनंद परब, उद्योजक अभय परब, पंचायत समिती माजी उपसभापती प्रफुल्लचंद्र उर्फ बाळू परब व ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर त्यांनी सहकुटुंब श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, मातोंड गावाशी आमची अस्मिता ही आजची नसून पिढ्यान पिढ्याची आहे. नेहमीच हा देवस्थान संदर्भात आमचं येणं या गावात होत. त्यामुळे या लोकांशी ही सातत्याने होती व राहील. श्री देवी सातेरीच्या मंदिराभोवती घातल्या जाणाऱ्या लोटांगणात आम्ही यापूर्वी भाग घेतला आहे. तर या देवीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्याची संधीही सातत्याने प्राप्त झाली आहे. त्यामुळे हा अत्यंत महत्वपूर्ण क्षण आमच्या आयुष्यातील असल्याचे त्यांनी सांगितले.
