हरी खोबरेकर:इतरांसाठी सतराशे साठ;आमच्यासाठी एकच..
⚡मालवण ता.२६-:
इतरांसाठी सतराशे साठ… आमच्यासाठी एकच हिंदूहृदयसम्राट… एकच साहेब… बाळासाहेब अशा घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदूहृदयसम्राट उपाधी देणारे बॅनर लावल्याप्रकरणी आज मालवण येथे ठाकरे शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. कितीही बॅनर लागले तरी हिंदूहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच राहणार असे यावेळी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सांगितले.
राजस्थान विधानसभा निवडणूकांसाठी भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होऊन यावेळी लागलेल्या प्रचाराच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदयसम्राट असा करण्यात आल्याने या विरोधात ठाकरे शिवसेनेने आक्षेप घेत राज्यभर निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर मालवण मधील ठाकरे शिवसेनेतर्फे शाखा कार्यालयासमोर आज “इतरांसाठी सतराशे साठ… आमच्यासाठी एकच हिंदूहृदयसम्राट… बाळासाहेब ठाकरे” अशा मजकूराचा बॅनर झळकवत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, सिद्धेश मांजरेकर, यशवंत गावकर, हेमंत मोंडकर आदी व इतर उपस्थित होते.
