⚡कणकवली ता.२६-: बेन्टली सिस्टीम्स सॉफ्टवेअर कंपनीकडून कनेडी हायस्कूलला ओक लाख ३४ हजार १६६ रुपयेचा वॉटर प्युरिफायर प्लांट प्रदान करण्यात आला आहे.
कनेडी हायस्कूल आणि तुकाराम शिवराम सावंत जुनियर कॉलेज सायन्सचे माजी विद्यार्थी अतुल सुरेश राणे यांच्या पत्नी नम्रता राणे या भिरवंडे बिवणेवाडी येथील असून त्या सध्या वडोदरा गुजरात येथे बेंटली सिस्टम्स सॉफ्टवेअर कंपनी पेनसिल्व्हेनिया, अमेरिका या कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नातून माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व जुनियर कॉलेज कनेडी या प्रशालेला अत्याधुनिक पद्धतीचा अल्ट्रा फिल्टरेशन वॉटर प्युरिफायर प्लांट मंजूर झाला. हा वॉटर प्युरिफायर प्लांट प्रशालेत बसविण्यात आला. प्रति तास पाचशे लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारा हा प्लांट असून त्याची स्टोरेज क्षमता एक हजार लिटर आहे. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना निर्जंतुक शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. प्लान्ट मंजूर करण्यासाठी प्रशालेचे प्राचार्य सुमंत दळवी यांनी विशेष प्रयत्न केले. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत आणि मंडळाचे संचालक शालेय समितीचे सदस्य यांनी नम्रता राणे यांचे आभार मानले आहेत.
