राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी यांचा इशारा:रविवारी डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी
⚡सावंतवाडी ता.२५-: येथील उपजिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या असलेल्या सुविधा येत्या १५ दिवसात उपलब्ध करा, अन्यथा उपोषण छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी आज वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांना निवेदनद्वारे दिला. दरम्यान रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने तसेच खाजगी रुग्णालये देखील बंद असल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे एकतरी डॉक्टर रविवारी उपलब्ध करा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. श्री. दळवी यांनी आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ऐवाळे यांची भेट घेऊन विविध समस्या मांडल्या.
यावेळी दळवी म्हणाले की येथील उपजिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून अनेक रुग्ण येत असतात. परंतु त्यांना व्यवस्थित सुविधा मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. काहींची परिस्थिती चांगली असते ते अन्य ठिकाणी जातात. परंतु काही लोकांची परिस्थिती नसल्याने ते काहीच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना अधिकच्या सुविधा देण्याचे प्रयत्न करा, अशी त्यांनी मागणी यावेळी केली. अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही असाही इशारा देखील श्री दळवी यांनी यावेळी दिला.
यावेळी शहराध्यक्ष देवा टेमकर, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, हिदायतुल्ला खान, इफतिकार राजगुरू, राकेश नेवगी, याकुब शेख आधी उपस्थित होते,
