डिसेंबर महिन्यात येते आहे नियुक्त: समिती समोर पुरावे होणार सादर..
ओरोस ता १८
जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार हे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यातील आपल्याकडे असलेले पुरावे २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत विशेष कक्षात सादर करावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
राज्यातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करणेसाठी न्यायमुर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली सामान्य प्रशासन विभागाच्या ७ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तसेच ३१ ऑक्टोबर २०२३ चे शासन निर्णयान्वये अवलंब करावयाच्या कार्यपध्दती बाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हयातील अभिलेख पडताळणीचे काम युध्दपातळीवर सुरु असून ते अतिम टप्प्यात आहे.
त्यानुसार जिल्हयातील सर्व नागरीकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी जुनी अभिलेख या कार्यालयातील विशेष कक्षात (सामान्य शाखेत) २१ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सादर करावेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या विशेष कक्षातील सदस्य नायब तहसीलदार संतोष खरात यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४०४३९५३५५ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
चौकट
या कामाचा आढावा घेणेसाठी ११ डिसेंबर २०२३ रोजी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखालील समिती सिंधुदुर्ग कार्यालयात येणार असून ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सदरची आढावा सभा होणार आहे. यासाठी न्यायमूर्ती संदिप शिंदे (निवृत्त) समिती कक्ष यांजकडील पत्र क्रमांक समिती २०२३ प्र.क्र. ०३/ समिती कक्ष दिनांक १७/११/२०२३ नुसार जिल्हयातील नागरीकांकडून पुरावे / कागदपत्रे समिती कामकाजाकरीता स्वीकारणेच्या सूचना दिलेल्या आहेत.
