बाळु सावंत:तात्काळ बॉक्सवेलची सुविधा देण्याची केली मागणी..
⚡बांदा ता.१७-: बांदा कट्टा कॉर्नर चौकात उड्डानपुलाचे काम प्रगतीपथावर आहे. शहरातील आंगडीवाडी येथून खेमराज प्रशालेत तसेच शहरात येण्यासाठी महामार्ग ओलांडून यावे लागते. मात्र याठिकाणी उड्डाणपुलाच्या आराखड्यात बॉक्सवेलची सुविधा नसल्याने स्थानिकांना शहरात जाण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे. त्यासाठी याठिकाणी तात्काळ बॉक्सवेलची सुविधा द्यावी अशी आग्रही मागणी ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केली आहे.
यासंदर्भात लवकरच राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले. उड्डाणंपूल याठिकाणीच संपत असल्याने याठिकाणी बॉक्सवेल देण्यात आला नाही. मात्र येथून शहरात जाण्यासाठीची हा परंपरागत रस्ता आहे. या रस्त्याचा वापर शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. तसेच गोव्यातून शहरात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.
याठिकाणी बॉक्सवेल न दिल्यास स्थानिकांना तसेच शाळकरी मुलांना शहरात जाण्यासाठी लांबचा फेरा पडणार आहे. याची दखल घेत महामार्ग विभागाने तातडीने याठिकाणी बॉक्सवेल मंजूर करावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
