गणेशोत्सव काळात ‘डीजे’ला बंदी…

मालवणातील गणेशोत्सव नियोजन बैठकीत पोलीस निरीक्षकांची माहिती..

⚡मालवण ता.०५-: डीजेला परवानगी नसल्याने गणेशोत्सव काळात डीजे ला बंदी असणार आहे. पारंपारिक स्वरूपात वापर होणाऱ्या वाद्यांचा वापर करावा. मिरवणूक, स्पीकर यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी, अशा प्रकारची सूचना मालवणचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी गणेशोत्सव नियोजन बैठकीत करत सर्वांच्या सहकार्यातून गणेशोत्सव साजरा करूया असे सांगितले.

मालवण पोलीस स्थानक व तहसील प्रशासन, नगरपालिका व अन्य प्रशासन यांच्यावतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे गणेशोत्सव नियोजनाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामराव जाधव, डॉ. वक्रतुंड वस्त, वीज वितरणचे अधिकारी सचिन म्हेत्रे, गुरूदास भुजबळ, एसटी प्रशासन, व्यापारी संघांचे नितीन तायशेटे, उमेश नेरूरकर, नाना पारकर, दिपक पाटकर, हर्षल बांदेकर, सरदार ताजर, तारकर्ली पर्यटन संस्थेचे मिलिंद झाड, दादा वाघ तसेच शहरातील व्यापारी, पोलीस पाटील, रिक्षा व्यावसायिक, लक्झरी मालक, पर्यटन व्यावसायिक आदि उपस्थित होते.

नगरपालिका व पोलीस प्रशासन वाहतूक व्यवस्था, पार्किंगचे नियोजन, ट्रॅव्हल नियोजन, बाजार व अन्य विक्रेते यांचे बैठक नियोजन करणार आहे. १७ ते ३० सप्टेंबर या कालावधीत मालवण बाजारपेठेतून जाणारी एसटीची वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली. मालवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यानी विक्रीच्या वस्तू अडथळा होतील अश्या ठेवू नये, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात लक्झरी बस मालवणात दाखल होऊन देऊळवाडा सागरी महामार्ग येथे पार्किंगसाठी जागा कमी पडत असल्याचे तसेच तेथे भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे तेथून बस वाहतूक करताना अडथळा येत असल्याचे लक्झरी बस व्यवसायिकांनी सांगितले. यावर ज्यादा एसटी, लक्झरी, वाहने यांच्यासाठी हायस्कूल परिसर किवा कुंभारमाठ येथे पार्किंगच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात येईल. ट्रॅव्हल व्यवसायिकांनी आपापसात सहकार्य करून व आपला प्रतिनिधी नेमून सागरी महामार्गांवर बस पार्किंग करावे असे यावेळी पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे यांनी सांगितले.

दि. १८ सप्टेंबर रोजी आठवडा बाजार, फुलपत्री बाजार दोन्ही एकाच दिवशी येत असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याबाबतचे नियोजन करण्यात येईल. नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्यावतीने शहरातील पार्किंगचे नियोजन केले जाईल. त्याबाबतची माहिती माध्यमांद्वारे दिली जाईल असेही पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी स्पष्ट केले.

मालवण तालुक्यात एकूण १५ डेंगूसदृश्य रूग्ण आढळले होते. त्या रुग्णांची रक्त तपासणी करून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्यात आले. गणेशोत्सवच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठ्या संख्येने मालवण तालुक्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे साथ रोग्यांच्या पार्श्वभूमीवर रक्त तपासणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या नमुन्याचीही तपासणी करण्यात येणार आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शामराव जाधव यांनी स्पष्ट केले.

वीज वितरणचे अधिकारी सचिन म्हेत्रे यांनी गणेशोत्सव कालावधीत वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील राहणार आहेत. मालवण वीज वितरण कार्यालय येथे दिवस रात्र कंट्रोल रूम सुरू राहणार आहे, असे सांगितले. नितीन तायशेटे यांनी शहरातील मुख्य ठिकाणी पोलीसांची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून वादाचे प्रसंग टाळले जातील, असे सांगितले. यावर पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात येणार असे सांगितले.

You cannot copy content of this page