कोकण पर्यटन उपसंचालक हनुमंत हेडे यांची ग्वाही
⚡मालवण ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला फार मोठी संधी असून यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने ग्राम पातळीवर पर्यटन विकासास चालना देण्यासाठी हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी प्रत्येक गावाची पर्यटन, भौगोलिक व ऐतिहासिक माहिती असणारे ई बुक व वेबसाईट तयार होणे गरजेचे आहे. तसेच गावात पर्यटन सुविधा निर्माण होण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी नियोजन करावे. पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या ग्रामीण पर्यटन चळवळीला शासन पाठबळ देईल, असे प्रतिपादन कोकण विभाग पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला फार मोठी संधी असून सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाने या जिल्ह्यातील ग्राम पर्यटनावर विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर बैठका घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्याची बैठक आज मालवण पंचायत समितीच्या सभागृहात कोकण पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक श्री. हनुमंत हेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, उपाध्यक्ष कमलेश चव्हाण, सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोलकर, मालवण तालुकाध्यक्ष अवि सामंत, मालवण शहराध्यक्ष मंगेश जावकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपसंचालक हनुमंत हेडे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी समृद्ध जिल्हा असून प्रत्येक गावात पर्यटन व्यवसाय उभारी घेऊ शकतो. यासाठी निवास व पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृहे, रस्ता आदी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. पर्यटन संचालनालयाच्या योजना तळागाळात पोहचविल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.
यावेळी बाबा मोंडकर म्हणाले, ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी शासन आर्थिक मदत द्यायला तयार असून त्यासाठी गावातील ग्रामपंचायत आणि त्या गावातील गावाच्या विकासासाठी सकारात्मक विचार करणाऱ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या या चळवळीस हातभार लावावा. ग्रामीण पर्यटन विकासासाठी आपण सगळ्यानी झोकून देऊन काम करण्याची आवश्यकता असून आपल्या गावातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची तपशीलवार माहिती संकलित करून शासन स्तरावर सादर करा. यासाठी पर्यटन व्यवसायिक महासंघ सर्वोतोपरी सहकार्य करेल असेही ते म्हणाले.
यावेळी उपस्थित सरपंच, पर्यटन व्यावसायिक, पर्यटन प्रेमी नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण श्री. हेडे व श्री. मोंडकर यांनी केले. यावेळी विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, पर्यटन व्यवसायिक दादा वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर, स्वाती पारकर, ऍड. ओंकार केणी, प्रकाश तोंडवळकर, दिपक सुर्वे, मिलिंद झाड, सौ. सिया धुरी आदी व इतर उपस्थित होते.
