कापड-गणवेश विक्रेत्यांची आग्रही मागणी
⚡कणकवली ता.२२-: चालू वर्षी शासनाने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत मुलांना आकाशी शर्ट व निळी पॅन्ट/स्कर्ट असा, मोफत गणवेश पुरवला जाणार असा आदेश ६ जुलै २३ रोजी निर्गमित केला आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कापड- गणवेश व्यापाऱ्यांनी गेल्या दोन-तीन वर्षातील गणवेश कमी पडल्याचा अनुभव लक्षात घेऊन चालूवर्षी लागणारा स्टॉक अगोदरच दुकानी उपलब्ध केला आहे.त्यामुळे सदरचा माल विना विक्री पडून राहून, व्यापाऱ्यांना अतोनात तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. व्यापाऱ्यांनी जिल्ह्यातील शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना याबाबत पुनर्विचार करून पुढील २०२४-२५ मध्ये गणवेश बदलाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने संतोष माळवदे यांनी केली आहे.
गेली दोन-तीन वर्षे शाळा सुरू झाल्यानंतर,पालक अथवा शाळेतील शिक्षक मुलांच्या संख्येप्रमाणे गणवेश खरेदी करतात. जून- जुलैमध्ये आवश्यक गणवेश येथील व्यापारी, सोलापूर-मुंबई-कराड येथून चार महिने आधीच, मागणी नोंदवून तयार करून आणतात. दरवर्षी जुलैमध्ये गणवेश कमी पडत होते, त्याकरिता चालू वर्षी पुरेसा स्टॉक ,जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी मे- जून मध्ये दुकानात उपलब्ध केला.आणि शासनाने मागील गणवेशाचे रंग व पॅटर्न बदलून आकाशी शर्ट व निळी पॅन्ट/ स्कर्ट असा बदलल्याने, व्यापाऱ्यावर माल पडून राहण्याची व तोटा होण्याची नामुष्की आली आहे.
चांगला निर्णय राबवताना सर्वंकष विचार होणे गरजेचे आहे. तरी हा निर्णय पुढील वर्षी २०२४/२५ या शालेय वर्षी राबवावा आणि जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे हजारो रुपये होणारे नुकसान टाळून दिलासा द्यावा,अशी आग्रही मागणी कापड-गणवेश व्यापाऱ्यांकडून होत आहे. याचा सिंधुदुर्गातील आमदार व शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे गांभीर्याने विचार करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
