केर भेकुर्ली चार दिवस अंधारात

उपसरपंचांचा इशारा: विद्युत वाहिन्यांवरील झाडी तोडा;अन्यथा उपोषण

दोडामार्ग,ता.20-:
तालुक्यातील टोकाचे गाव असलेल्या केर भेकुर्लीचा बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे.त्यामुळे विद्युत वाहिन्याना लगडलेली झाडी मे महिन्यात साफ करावी अशी मागणी सातत्याने करूनही याकडे लक्ष न दिल्याने चार दिवसांपासून केर – भेकुर्ली परिसर अंधारात आहे. त्यामुळे जर येत्या आठ दिवसांत विद्युत वाहिन्या झाडीमुक्त न केल्यास कोणत्याही क्षणी उपोषण करण्याचा इशारा केर – भेकुर्ली ग्रामस्थांच्यावतीने उपसरपंच तेजस देसाई यांनी दिला आहे.
केर – भेकुर्ली गावातील ग्रामस्थ नेहमी वीज वितरणला सहकार्य करत असतात. सद्यस्थितीत केर – भेकुर्लीत अंधार आहे. वायरमन पोल खाली जाऊ शकत नाही एवढी झाडी गच्च आहे. यापूर्वी मे महिन्यात विद्युत पोल बदलताना कामगार जाऊ शकले नव्हते त्याचवेळी लाईन सफाई करण्याची मागणी केली होती; मात्र ती पूर्ण न झाल्याने आता गावामध्ये अंधार आहे. त्यामुळे तातडीने लाईन सफाई काम हाती घ्यावे आणि वीज ग्राहक तथा ग्रामस्थ यांची गैरसोय दूर करावी अशी मागणी श्री. देसाई यांनी केली आहे.
सध्या शेतकरी शेती कामात व्यस्त आहेत. दिवसभर शेतीकामे करुन तिन्हीसांजेला घरात आल्यावर अंधार बघितल्यावर त्यांचा संताप अनावर होत आहे.

You cannot copy content of this page