प्रसन्न देसाई:बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधणार
वेंगुर्ला प्रतिनिधी- लोकसभा प्रवास योजना २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे उद्या १९ जुलै रोजी वेंगुर्ला दौ-यावर येत असून ते परबवाडा बुथ नं.५७ वर बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. तसेच शहरातील विकासकामांना भेटी देऊन पहाणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणी प्रसन्ना देसाई यांनी पत्रकारांना दिली.
केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या दौ-यानिमित्त वेंगुर्ला तालुका भाजपा संफ कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश सचिव शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सरचिटणीस साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, अल्पसंख्यांक सेलचे सायमन आल्मेडा, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, परबवाडा उपसरपंच पपू परब आदी उपस्थित होते.
देशात १४४ लोकसभा मतदार संघात भाजपाचे खासदार नाहीत. महाराष्ट्रात १८ मतदार संघात भाजपाचे खासदार नाहीत. ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे खासदार नाहीत अशा चार चार मतदार संघाचे क्लस्टर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या संयोजकपदी माजी मंत्री बाळासाहेब झगडे यांची नियुक्ती केली आहे. सहसंयोजक प्रमोद जठार असून रत्नागिरी व सिधुदुर्गचे संयोजक अतुल काळसेकर आहेत. या सर्वांच्या नेतृत्वाखाली लोकसभा प्रवास योजनेचे काम सुरू आहे. अजय कुमार मिश्रा यांनी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यापूर्वी दौरा केला होता. मात्र, ते वेंगुर्ल्यात आले नव्हते. त्यामुळेच ते १९ जुलै रोजी वेंगुर्ल्यात प्रथमच येत आहेत.
१९ रोजी सायंकाळी ४ वाजता ते वेंगुर्ला न.प.च्या स्वच्छ पर्यटन स्थळाला भेट देणार आहेत. त्यानंतर न.प.च्या कलादालनास भेट, ५ वा. परबवाडा बुथ नं.५७ वर बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शहरातील विविध विकास कामांना भेटी देणार असल्याची माहिती प्रसन्ना देसाई यांनी दिली.
