केणीवाड्यामध्ये पाण्याच्या ‘वॉल’वरून अधिकारी धारेवर

आठ दिवसात खोदाई करून वॉल दाखविणार : एमजीपी अधिकाऱ्यांचे आश्वासन

⚡बांदा ता.२८-: महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनला पाडलोस केणीवाडा येथे वॉल ठेवण्यास अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु बाहेर पाण्याचा वॉल दिसत नसल्याने आज अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. ग्रामस्थांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष खोदाई करून आपणास जमिनीत असलेला पाण्याचा वॉल दाखविणार असल्याचे हमी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी श्री. शेलार यांनी दिल्याने ग्रामस्थ शांत झाले.


पाडलोस केणीवाडा येथील ग्रामस्थांना सद्यस्थितीत पाण्याची टंचाई भासत आहे. भविष्यात पाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच घटनास्थळी बोलावले. यावेळी पाडलोस ग्रा.पं.सदस्य काका परब, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, पाडलोस सिंधु दुग्ध संस्था सचिव आनंद कुबल, माजी ग्रा.पं. सदस्य गणपत पराडकर तसेच ग्रामस्थ श्रवण पराडकर आदी उपस्थित होते.
केणीवाडा येथे पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. पाळीव जनावरांना तर मुबलक पाणी मिळणे दुरापास्त झाले. शेती बागायती सुकत चालल्याने शेतकऱ्याला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले. त्यात येथून जाणाऱ्या पाईपलाईनला वॉल न ठेवल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली व अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवले.
एमजीपीचे अधिकारी श्री.शेलार यांनी सांगितले की, मागणीप्रमाणे वॉल ठेवण्यात आले आहेत. याठिकाणीही वॉल असून येत्या आठ दिवसात खोदाई करत वॉल दाखवून आपले समाधान करण्यात येईल अशी हमी दिल्यानंतर आक्रमक ग्रामस्थ शांत झाले. दरम्यान, खोदाई केल्यानंतरच अधिकाऱ्यांची सत्यता समोर येणार असल्याचे पाडलोस शिवसेना(ठाकरे गट) शाखाप्रमुख महेश कुबल यांनी सांगितले.

You cannot copy content of this page