विविध समस्या सोडविण्यासाठी वेधले लक्ष
कुडाळ :
ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामपंचायत कर्मचारी या पदाला न्याय मिळत नसून आपल्या विविध प्रकारच्या मागण्या आजही प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी कुडाळ तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवस काम बंद ठेऊन लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे. हे उपोषण १ मे रोजी कुडाळ पंचायत समिती समोर करण्यात येणार आहे अशी माहिती कुडाळ तालुका संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बिड्ये यांनी दिली आहे.
आपल्या प्रलंबित मागण्यांबाबतचे निवेदन कुडाळ गटविकास अधिकारी यांना दिले आहे. यात विविध मागण्यांचा समावेश आहे.सर्व ग्रा.पं. कर्मचारी आकृतीबंधातील व बाहेरील तुटपुंज्या पगारावर शासनाच्या विविध कामे ग्रा.पं.दफ्तरी काम सांभाळून करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना हक्काच्या मागण्या तसेच महागाईच्या दृष्टीने पगार वाढ मिळणे गरजेचे आहे.ग्रा.पं. कर्मचार्याच्या अर्जावर कुठलीच दखल घेतली जात नाही. या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना प्रशासन स्तरावर न्याय मिळणे गरजेचे आहे. या प्रलंबीत मागण्यांमध्ये कसाल ग्रा.पं. कर्मचारी कै प्रशांत राणे कर्तव्य बजाविताना आकस्मिक निधनाचे र.रु.२० लाख विमा रक्कम मिळावी. शासन निर्णयानुसार मंजूर सुधारित किमान वेतन ऑनलाइन बदल होवून पूर्ण व वेळेत मिळावे, उर्वरित सर्व ग्रामपंचायत कर्मचार्याचे अपघात विमे उतरविण्यात यावे. ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पूर्ण करण्यात यावीत. सध्याच्या शासन निर्णयानुसार ग्रा.पं. फेर आकारणी होवून ग्रा.पं.चे उत्पन्न कर्मचार्यांच्या सहकार्यातून वाढलेले आहे तरी वाढीव उत्पन्नातून ग्रा.पं. कर्मचाऱ्याला किमान वेतनाव्यतिरिक्त ग्रा.पं. फंडातून प्रति दिन शंभर रु. प्रमाणे वाढ मिळण्यासाठी प्रशासन स्तरावरून सरपंच, ग्रामसेवक यांना लेखी स्वरुपात पत्र द्यावे.या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून यापूर्वी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन स्तरावर दिलेल्या अर्जावर कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा. अशा विविध मागण्या ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने केल्या आहेत. याबाबतचे पत्र कुडाळ गटविकास अधिकारी यांना दिले आहे. अशी माहिती ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र बिड्ये यांनी दिली आहे.
