मोकाट गुरांच्या समस्येबाबत कमलाकांत खोत यांचे २५ पासून उपोषण

⚡मालवण ता.१०-: मालवण शहरात धुरीवाडा भागात मोकाट गुरांमुळे नागरिकांना समस्याना सामोरे जावे लागत आहे. संबंधित गुरांच्या मालकाला नगरपालिकेने गुरांचा बंदोबस्त करण्याबाबत नोटीस देऊनही गुरे मालकाने बंदोबस्त केलेला नाही. यावर नगरपालिकेनेही अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने याविरोधात दि. २५ मार्च पासून मालवण नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कामालाकांत खोत यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

मालवण शहरात मोकाट गुरांचा संचार वाढला असून यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धुरीवाडा खोत मठ परिसरात काही गुरांच्या कळपामुळे अनेक समस्या उद्भवल्या आहेत. गुरे रस्त्याने मोकाट फिरत असल्याने पादचारी व वाहनचालकांना त्रास होत आहे. याबाबत कमलाकांत खोत यांनी मालवण नगरपालिकेकडे केलेल्या तक्रारीवरून मालवण नगरपालिकेने संबंधित गुरे मालकास मोकाट फिरणाऱ्या गुरांचा सात दिवसात बंदोबस्त करण्याची नोटीस बजावत बंदोबस्त न केल्यास कारवाईचा इशारा दिला. मात्र संबंधित गुरे मालकाने गुरांचा अद्यापही बंदोबस्त केला नसून याबाबत नगरपालिकेकडून योग्य ती कारवाई झालेली नाही. त्यामुळे धुरीवाडा खोत मठ परिसरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त व्हावा व गुरे मालकावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी २५ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा कमलाकांत खोत यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page