⚡मालवण ता.०७-: महिला दिनाचे औचित्य साधून मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. वाचन मंदिरच्या नव्या इमारतीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रेवतळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. मेधा गोगटे- देशमुख यांचा ज्येष्ठ शिक्षिका संध्या पाटकर यांच्या हस्ते तर शिशुविहार -काळे आजींची बालवाडीच्या मुख्य शिक्षिका सौ. संस्कृती (कमल) बांदकर यांचा अक्षता बांदेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना स्मृतिचिन्ह व शिवाजी वाचन मंदिर शतकोत्सव स्मरणिका देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवाजी वाचन मंदिरच्या अध्यक्षा सौ. मेधा शेवडे, उपाध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, कार्यवाह सौ. वैदेही जुवाटकर, सदस्य बबन परुळेकर, हेमा परुळेकर, श्रीधर काळे, सचिन बांदकर, बाळू काजरेकर, प्रिया दुदवडकर, शांभवी कोळगे, निशा बिडये, प्रज्ञा राणे, शर्वरी घाडी, नंदिनी गावकर, आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ. गोगटे म्हणाल्या, आज झालेला आपला सत्कार हा सरस्वतीचा आशीर्वाद आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या ज्ञात महिलांचे स्मरण करतानाच लढ्यास सहाय्य करणाऱ्या ज्ञात नसणाऱ्या महिलांचीही आठवण ठेवली पाहिजे. वाचन मंदिरात येऊन महिलांनी पुस्तक वाचनातून विचारांची प्रगल्भता वाढवावी, महिलांनी कुटुंब आणि माणसे जोडून ठेवली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तर सौ. संस्कृती बांदकर म्हणाल्या, आज स्त्री ने कोणतेही कार्य करण्यास लाजू नये. लोक काय म्हणतील याकडे महिलांनी दुर्लक्ष करून प्रयत्न करीत आपली प्रगती साधावी, प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी संध्या पाटकर व मेधा शेवडे यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन वैदेही जुवाटकर यांनी केले. तर आभार शांभवी कोळगे यांनी मानले.
