हेल्दी वूमन, हेल्दी इंडिया अंतर्गत सायकलिंग, योगा, मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
ओरोस ता ७
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ८ मार्च या महिला दिनाच्या निमित्त जिल्हाभरात महिलांसाठी आरोग्यविषयक उपक्रम घेण्यात येणार आहेत. शासनाच्या “हेल्दी वूमन, हेल्दी इंडिया” उपक्रमांतर्गत सायकलिंग, योगा, आरोग्य विषयक मार्गदर्शन असे उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येणार आहेत. अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत ८ मार्च या महिला दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील महिला व महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय कार्यक्रम सिंधुदुर्ग नगरी येथे तर आठ ही तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी आशा कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाभरात “आशा डे” साजरा केला जाणार आहे. याशिवाय सायकलीग, योगा, यासारखे उपक्रम घेतले जाणार आहेत. महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन व त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक ती माहिती दिली जाणार आहे. अशी माहिती माता व बालसंगोपन अधिकारी तथा प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली.
- जन औषधी दिवस साजरा
शासनाच्या आयुष्यमान भारत योजना अंतर्गत जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर “जन औषधी दिवस” साजरा करण्यात आला. महिलांच्या आरोग्य तपासणीसह डायबिटीस, उच्च रक्तदाब, असलेल्या महिलांना एक महिन्याच्या गोळ्या मोफत वाटप करण्यात आल्या तर महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी यापुढेही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ सई धुरी यांनी सांगितले.
