⚡मालवण ता.२८-: भंडारी प्राथमिक शाळेच्या सुरुवातीपासून श्रीमती प्रज्ञा कांबळी यांनी शाळेची धुरा समर्थपणे सांभाळली. प्रतिकूल परिस्थितीतही कांबळी यांनी ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू ठेवले. छोट्या मुलांना आपलेसे करून त्यांना मायेने शिकविण्याच्या कौशल्यामुळेच कांबळी या विद्यार्थिप्रिय शिक्षिका बनल्या, असे प्रतिपादन भंडारी एज्यूकेशन सोसायटी (मालवण)मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी श्रीमती कांबळी यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमात बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा प्रसाद कांबळी या २४ वर्षाच्या शिक्षकी सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाल्या. यानिमित्त प्रशालेच्या सभागृहात आयोजित सेवापुर्ती समारंभात भंडारी एज्यूकेशन सोसायटीतर्फे श्रीमती कांबळी यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुछ व सन्मानपत्र देऊन कांबळी यांना सन्मानित करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, खजिनदार जॉन नरोना, सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र वराडकर, प्रकाश कुशे, सुहास ओरसकर, हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत, माजी मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया टिकम, ऍड. आनंद गवंडे, तुळशीदास मयेकर , नूतन मुख्याध्यापक भुपेश गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्रीमती प्रज्ञा कांबळी म्हणाल्या, भंडारी प्राथमिक शाळेची सुरुवात झाली आणि आपण या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. शिक्षकी पेशा आपण आवडीने स्वीकारला, त्यामुळे या कार्यात कधीच कंटाळा आला नाही, शिक्षण सेवा कार्यात तसेच जीवनातील प्रतिकूल परिस्थितीत सहकारी शिक्षक व संस्थेची साथ लाभल्यानेच आपण उत्तम प्रकारे सेवा बजावू शकलो, सर्वांच्या सहकार्याबद्दल आपण आभारी आहोत, असेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक श्री भूपेश गोसावी यांनी केले. यावेळी रवींद्र वराडकर यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ. राधा दिघे यांनी केले. यावेळी उपस्थितांनी श्रीमती कांबळी यांना भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, कलाशिक्षक अरविंद जाधव, नंदकिशोर मळेकर, महेश लोकेगावकर, शिक्षिका संजना सारंग , श्रीमती ए एस चव्हाण, सौ. पूर्वी गोवेकर, सौ. मुणगेकर, सेवानिवृत्त कर्मचारी सौ. वृषाली टक्के, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. स्नेहा साटलकर, उमेश वराडकर, सुनील वराडकर, माजी विद्यार्थी महेंद्र पराडकर, आपा मालंडकर, भूषण मेतर, संग्राम कासले यांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
