मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या

विद्यार्थ्यांत खळबळ:नेमके कारण अस्पष्ट; पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद

ओरोस ता २७
सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
आशिष गहल्यान (वय १९), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हरयाणा राज्यातील करनाल येथील हा विद्यार्थी असून तो दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. आशिष याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे लक्षात येताच अन्य विद्यार्थ्यांनी त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी आशिष याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी जाहीर केले.
याबाबत माहिती मिळताच सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थी आशिष याने गळफास घेतलेले ठिकाण, घटनास्थळाचा शासकीय पंचांसमक्ष पंचनामा केला आहे. सर्व घटनास्थळची पाहणी केली असता सुसाईड नोट वगैरे मिळून आलेले नाही. वैद्यकीय कॉलेजचे प्रोफेसर तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता आज रोजी ह्यूमन ॲनाटोमी विषयाचे प्रॅक्टिकल एक्झाम होती. तसेच प्रॅक्टिकल परीक्षा करीता त्याचा पहिलाच क्रमांक होता, असे समजून आलेले आहे. त्यामुळे आत्महत्या कशासाठी केली, हे स्पष्ट होवू शकलेले नाही. दरम्यान, आशिष याच्या मृत्यूचे निश्चित कारण समजण्याकरिता वैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदन करण्याची विनंती करण्यात आले असल्याचे प्रभारी अधिकारी हेमंत देवरे यांनी सांगितले. घटनास्थळी सावंतवाडी उपविभागीय अधिकारी डॉ रोहिणी सोळुंके यांनी भेट माहिती जाणून घेतली आहे.

You cannot copy content of this page