साटेली येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची यशस्वी सुटका…

⚡सावंतवाडी ता.२५-: येथील साटेली गावातील खालचीवाडी भागातील राहणाऱ्या श्री.आनंद सावंत यांच्या शेतातील विहिरीत काल रात्री पडलेल्या बिबट्याची वन विभागामार्फत यशस्वी सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान सावंतवाडी वन विभागाला साटेली येथे विहिरीमध्ये बिबट्या पडला असलेबाबत माहिती मिळाली.

त्यानुसार सावंतवाडी वनपरिक्षेत्राचे शीघ्र कृतीदल सदर बिबट्याच्या सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता सदर बिबट्या पूर्णवाढ झालेला अंदाचे अडीच वर्षे वयाचा बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. सदर बिबट्या रात्री 11 च्या दरम्यान भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला असावा असे दिसून आले. बिबट्या विहिरीत पाईपच्या सहाय्याने लोंबकळत तग धरून राहिला होता. त्याला तरंगण्यासाठी तत्काळ लाकडाचा ओंडका विहिरीत सोडण्यात आला. त्यानंतर सदर बिबट्याचा त्या भागात अधिवास असल्याकारणाने त्याला विहिरीतून बाहेर येण्यासाठी शिडी व त्याला जोडलेल्या लाकडांचा आधार देऊन विहिरीत सोडण्यात आले.

त्या शिडीचा आधार घेऊन बिबट्या विहिरीच्या बाहेर यशस्वीरीत्या बाहेर आला व त्याच्या नैसर्गिक अधिवासात निघून गेला.

या बचाव मोहिमेत उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री.एस नवकिशोर रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल नागेश खोराटे, आप्पासाहेब राठोड, संग्राम पाटील, प्रकाश रानगिरे, महादेव गेजगे, रेडकर भाऊ, पडते भाऊ, स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी बांधव यांनी मोलाचे सहकार्य केले.

You cannot copy content of this page