ठाकरे गटाच्या मनोज मोंडकर, पूनम चव्हाण यांनी नागरिकांच्या वतीने मानले आभार
मालवण (प्रतिनिधी)
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत मालवण शहरातील देऊळवाडा आडवण भागातील ८७ लाखांची चार कामे मंजूर झाली आहेत, याबद्दल या भागातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.
देऊळवाडा आडवण भागातील विविध कामे मार्गी लागण्यासाठी मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधून पाठपुरावा केला होता. याबाबत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनीही शहरातील अन्य विकास कामांप्रमाणे या भागातील कामांबाबत खास. राऊत व आम. नाईक यांचे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत यातील चार कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये देऊळवाडा येथील रामेश्वर मंदिर ते सातेरी मंदिर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे नूतनीकरण करणे (रु.१५ लाख), देऊळवाडा स्मशानभूमी नूतनीकरण करणे व शेड बांधकाम (२० लाख), देऊळवाडा आडवण येथील मायनर ब्रिज बांधणे (४५ लाख), आडवण येथील गोवेकर घराकडे जाणाऱ्या मायनर ब्रिज कम मोरीचे बांधकाम करणे (७ लाख) या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. कामे मंजूर होण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल खास. राऊत व आम. नाईक यांचे तसेच शासनाचे मनोज मोंडकर व पूनम चव्हाण यांनी आभार मानले आहेत.
