कास सरपंच प्रवीण पंडीत यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष..
⚡बांदा ता.२३-: तेरेखोल नदीपात्रात कास व सातोसे गावाच्या हद्दीत होणार्या बेकायदा वाळू उपशाबाबत कास ग्रामपंचायत प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कास सरपंच प्रवीण पंडीत यांनी वाळू उपसा रोखण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. यात वाळू माफियांकडून ग्रामस्थांवर हल्ले होत असून पोलीस प्रशासन माफियांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही निवेदनातून केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तेरेखोल नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राजरोसपणे बेकायदा वाळू उपसा सुरु आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत उपसा सुरु असतानाही कारवाई मात्र केली जात नाही. बर्याच वेळा स्थानिकांनी महसूल व पोलीसांकडे वाळू माफिया रंगेहाथ पकडून दिलेत. मात्र किरकोळ दंड करुन त्यांना सोडून देण्यात येते. त्यामुळे वाळू उपसा सुरुच आहे.
काही दिवसांपूर्वी कास गावातील वाळू माफियाला परवान्या बाबत विचारले असता शिवीगाळ करुन धमकी देण्यात आली. तलवारी घेऊन स्थानिकांवर हल्ले करण्याचा प्रयत्नही झाला. त्याबाबतची बांदा पोलीसात तक्रार देण्यात आली. मात्र वाळू माफियांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने बेकायदा वाळू उपसा रोखण्याची कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
