लोहयुक्त आहारामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढू शकते

दिप्ती मोंडकर;शिरवल ग्रा.पं. येथे ग्रामसंघातर्फे महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

⚡कणकवली ता.२३-: लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते.ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर अशा पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवावे.असे प्रतिपादन कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाप नर्स दिप्ती मोंडकर यांनी केले.

महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग आणि हिरकणी लोक संचलित साधन केंद्र कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवल ग्रामपंचायत येथे ग्रामसंघाच्यावतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना दिप्ती मोंडकर बोलत होता.

यावेळी व्यासपीठावर सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रविण तांबे, ग्रामसेवक राजेंद्र गुरव, पोलिस पाटील विजय शिरवलकर, आरोग्य सेवक डी.बी.सुर्वे, आरोग्य सेविका तृप्ती परब, महिला आर्थिक विकास महामंडळ कणकवली,सहयोगीनी भक्ती उंबळकर, गौरी ग्रामसंघ शिरवल,सी.आर.पी.प्रिती सावंत,अनिता घाडीगांवकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना दिप्ती मोंडकर म्हणाल्या कि,हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते. हिमोग्लोबिन हे प्राणवायू वाहुन नेण्याचे कार्य करते. फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते. हा प्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बनडायऑक्साईड हिमोग्लोबिनद्वारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होणारे रोग टाळण्यासाठी योग्य आहार आणि फॉलिक आम्ल, लोह आणि प्रथिने यांचा आहारात योग्य आणि पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे.असे मार्गदर्शन त्यांनी केले.

या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.हिमोग्लोबिन शिबिराचा लाभ गावातील ९० महिलांनी घेतला.कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाप नर्स दिप्ती मोंडकर आणि आरोग्य सेविका तृप्ती परब यांनी महिलांची हिमोग्लोबिन तपासणी केली.

या तपासणी शिबिरासाठी सहयोगिनी भक्ती उंबळकर, गौरी ग्रामसंघाच्या सि.आर.पी.प्रिती सावंत, प्राथमिक उपकेंद्र शिरवल, आरोग्य सेवक डि.बी.सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page