बांदा/प्रतिनिधी
अविरत ग्रुप कडून साजरी होणारी शिवजयंती यंदा माऊली महिला मंडळ संचालित मतिमंद मुलांची निवासी शाळा आरोस-दांडेली येथे साजरी करण्यात आली. २०१९ पासून दरवर्षी विनाअनुदानित शाळा किंवा सामाजिक सेवा संस्था यांना मदतीचा हातभार लावून अविरत ग्रुपतर्फे एका विशिष्ट पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात येते.
त्याप्रमाणे यंदा सलग पाचव्या वर्षी माऊली महिला मंडळ संचलित मतिमंद मुलांची शाळा आरोस-दांडेली येथे शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षिका सौ. नंदिनी आचरेकर, सौ. सरोज चव्हाण, राजू काळे, लिपिक शरद चव्हाण, अधिक्षक सुलक्षणा कोकरे व गंगाराम शेळके तसेच अविरत ग्रुपचे कृष्णा पास्ते, कृष्णराज देसाई, विनोद राणे, प्रसाद डेगवेकर, अक्षय सावंत, प्रशांत मांजरेकर, उल्हास नाईक, शाळेचा विद्यार्थिवर्ग आदि मान्यवर उपस्थित होते. अविरत ग्रुपचे शिवजयंती उपक्रम राबवण्याचे हे सलग पाचवे वर्ष आहे. याप्रसंगी सदर शाळेला इमारत उभारणीसाठी लागणाऱ्या साहित्याची मदत करण्यात आली.
नोकरीनिमित्त सावंतवाडी गोवा असा प्रवास करणारे प्रवासी सामाजिक जाणिवेतून एकत्र येवून या ग्रुपची निर्मिती करण्यात आली आहे. २०१९ ला जिवदान मतिमंद शाळा झाराप, या शाळेपासून शिवजयंती कार्यक्रम राबवण्यास सुरवात करण्यात आली. २०२० ला मतिमंद मुलांची शाळा आरोस-दांडेली याठिकाणी, २०२१ ला सरस्वती दयानंद छात्रालय, रोणापाल
येथे, त्यानंतर २०२२ ला अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमाला मदतीचा हात देवून आणि यंदा सलग पाचव्या वर्षी पुनः माऊली महिला मंडळ संचालित मतिमंद मुलांची शाळा आरोस-दांडेली याठिकाणी शाळेला मदत करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी नूतन इमारत बांधकामसाठी १५ हजार रुपये किमतीचे ५०० चिरे व साहित्य ग्रुप कडून देण्यात आले.
अविरत ग्रुपने मतिमंद मुलांच्या निवासी शाळेत साजरी केली शिवजयंती
