मत्स्य शेतकरी व मत्स्य संवर्धक यांचा सिंधुरत्न योजनेत समावेश करावा- रविकिरण तोरसकर

⚡मालवण ता.१५-: रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मत्स्यसंवर्धनास बळकटी देण्यासाठी मत्स्यसंवर्धन संबंधित मत्स्य शेतकरी तथा मत्स्यसंवर्धक यांचा सिंधुरत्न समृद्ध योजनेमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष रविकिरण तोरसकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक साधनसामग्रीवर आधारित पर्यटन, मत्स्यव्यवसाय व सूक्ष्म उद्योगांचा विकास करण्यासाठी सिंधूरत्न समृद्ध ही पथदर्शी योजना सन २०२२ ते २०२५ या तीन वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर योजनेअंतर्गत मत्स्यव्यवसाय या विषयात विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु सिंधूरत्न योजनेअंतर्गत जाहीर केलेल्या योजनांमध्ये मत्स्यसंवर्धन व अनुषंगिक गोष्टींसाठी योजनांचा समाविष्ट केलेला नाही. फक्त पिंजरा संवर्धनाचे बळकटीकरण या एकाच गोष्टीचा समावेश केलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मत्स्यसंवर्धनास बळकटी देण्यासाठी मत्स्यसंवर्धन संबंधित योजनांचा समावेश करण्यात यावा अशी मागणी रविकिरण तोरसकर यांनी निवेदनात केली आहे. या अंतर्गत मत्स्य शेतकरी यासाठी इन्सुलिटेड वाहन, मत्स्य खाद्य अनुदान योजना, मत्स्य बीज खरेदी, शेततळ्यातील मत्स्य शेती उपयुक्त निविष्ठा अनुदान, शोभिवंत मत्स्यपालन यांचा समावेश सिंधुरत्न योजनेत व्हावा, असे तोरसकर यांनी म्हटले आहे.

मत्स्यपालन या व्यवसायातून नीलक्रांतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी ,आज मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या खंबीर पाठिंबाची गरज आहे. म्हणूनच मत्स्य शेतकरी यास आत्मनिर्भर बनविण्यासाठी सिंधूरत्न समृद्ध योजनेमध्ये मत्स्यशेती अथवा मत्स्यसंवर्धन या व्यवसाय संबंधित गोष्टींचा समावेश करावा असेही रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page